पुणे : मोटार वाहन कर न भरल्याबद्दल आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांसाठी जप्त करण्यात आलेल्या ५७ वाहनांचा सार्वजनिक ई-लिलाव प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे (पुणे आरटीओ) १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. आरटीओ, पुणे, आळंदी रोड कार्यालय आणि वाघेश्वर स्टँडच्या परिसरात कार्यालयीन वेळेत वाहने तपासणीसाठी उपलब्ध असतात. यामध्ये टुरिस्ट टॅक्सी, बस, हलकी वाहतूक करणारी वाहने आणि रिक्षा यांचा समावेश आहे. लिलावाच्या तारखेपर्यंत कर भरण्याची संधी असेल.
ई-लिलावासाठी वाहनांची यादी पुणे आरटीओच्या सूचना फलकावर आणि माहितीसाठी वेबसाइटवरही टाकण्यात आली आहे. तसेच लिलावाच्या अटी व शर्ती 6 फेब्रुवारीपासून वरील वेबसाइटवर तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावर उपलब्ध असतील. सार्वजनिक ई-लिलाव वेबसाइटवर 7 ते 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:00 ते संध्याकाळी 5:00 पर्यंत खुला असेल. केवळ जीएसटी धारक ई-लिलावात भाग घेऊ शकतील.
मनीऑर्डर आरटीओ पुणे यांच्या नावाने जमा करावी
हलक्या वाहनांसाठी 25,000 रुपये आणि अवजड वाहनांसाठी 50,000 रुपयांची मनीऑर्डर प्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘आरटीओ पुणे’ या नावाने जमा करावी लागते. ही वाहने सार्वजनिक ई-लिलावाद्वारे ‘जशी आहे तशी’ तत्त्वावर विकली जातील. कोणतेही कारण न देता ई-लिलाव रद्द करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि कर आकारणी प्राधिकरणाकडे आहेत. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.