चौफेरन्यूज– पिंपळनेर :- प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गणेश चतुर्थी निमित्त राहुल पाटील यांच्या हस्ते स्कूलच्या प्रांगणात गणपती बाप्पाचे आगमन झाले. गणेश मूर्तीची स्थापना राकेश खैरनार, अश्विनी खैरनार यांच्या हस्ते यथाविधी पूजा करून करण्यात आली. याप्रसंगी गणपतीला झेंडूच्या फुलांची माळ, लाल फुले, फळे व मोदकांचा नैवेद्य दाखविण्यात आला. आरती करून धूप नैवेद्य दाखवून सर्वांनी मोदक प्रसादाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक प्रशांत भीमराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शाळेच्या प्राचार्या अनिता पाटील, व्यवस्थापक राहुल पाटील, सर्व शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग वाहक चालक वर्ग उपस्थित होते.
गणेश उत्सव म्हटले की, वेगवेगळ्या कल्पना करत विविध देखावे सादर केले जातात. बाप्पाच्या स्वागतासाठी खास सजावट केली जाते. आकर्षक मखर बनवले जाते. इस्रोच्या या कामगिरीला ट्रिब्यूट म्हणून प्रचिती शाळेच्या शिक्षिकांनी यंदा चांद्रयान- ३ चा देखावा साकारला आहे. आकाशगंगा, सोलर सिस्टीम, पॉवर स्टेशन देखावा प्रदर्शित करण्यात आला. आकर्षक लालबागच्या राजाची मूर्ती, मखरांच्या फुलांची सजावटीने लक्ष वेधून घेत आहे. गणपती बाप्पाच्या बाजूला पेपरने हुबेहुब यान तयार करण्यात आले आहे. यावर इसरो असं तसेच इंडिया इंग्रजीत लिहिलं आहे. तर यानाच्या मधोमध तिरंगा आहे. तसेच मूर्तीच्या उजव्या बाजूला एक मोठे अपारमेंट तयार करून त्यावर छत्री बसवण्यात आली आहे. असा सुंदर देखावा प्रचिती पब्लीक स्कूलमध्ये तयार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सुंदर रांगोळीचे रेखाटन व सुंदर फलक रेखाटन करण्यात आले.