साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या तीन खेळाडूंची विभागस्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये, 14 वर्षे वयोगटातील आर्यन पाटील (इयत्ता आठवी), 17 वर्षे वयोगटातील मधुर शेवाळे ( इयत्ता नववी), यथार्थ पाटील (इयत्ता आठवी) या खेळाडूंची योग कौशल्यांवरून विभागस्तरावर निवड करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धा सन 2023- 24 शालेय योगासन क्रीडा स्पर्धेमध्ये धुळे तालुका, साक्री तालुका, शिरपूर तालुका व शिंदखेडा तालुक्यातील जिल्हास्तरावर विजय झालेल्या खेळाडूंची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड चाचणी घेण्यात आली. मंगळवार, दि. 26 सप्टेंबर 2023 रोजी धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथील इनडोअर हॉल क्र. 1 येथे वयोगट 14 17 आणि 19 वर्ष वयोगटातील मुले- मुली यांची निवड चाचणी पार पडली. निवड स्पर्धेवेळी धुळे जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टेले उपस्थित होते. यामध्ये प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या तीन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
शासकीय योगासन स्पर्धेसाठी निश्चित केलेले योगासने योग्य पद्धतीने सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांची पारदर्शक पद्धतीने निवड करण्यात येते. यात ग्रुप अ आणि ब मध्ये निश्चित केलेले आसन सादर करावे लागतात. ग्रुप क मध्ये एकूण पाच आसनांपैकी एक ऐच्छिक आसन सादर करावे लागते. त्यानंतर आपल्या आवडीचे दोन ऐच्छिक आसन आपणास सादर करणे आवश्यक असते. या सर्व आसनांसाठी तीन परीक्षकांची नेमणूक केलेली करण्यात येते. त्यांच्या गुणदानावरून योग्य आसन लावणाऱ्या स्पर्धकांची विभाग स्तरावर निवड करण्यात येते. या सर्व पाय-या आर्यन पाटील (इयत्ता आठवी), 17 वर्षे वयोगटातील मधुर शेवाळे ( इयत्ता नववी), यथार्थ पाटील (इयत्ता आठवी) या खेळाडूंनी पार करून पुढील स्पर्धेसाठी आपली वाटचाल निश्चित केली.
या खेळाडूंच्या योग कौशल्यांचे कौतुक करत शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी विशेष कौतुक केले. शाळेच्या प्राचार्य वैशाली लाडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. शाळेचे व्यवस्थापक तुषार देवर, शाळेचे व्यवस्थापक व क्रीडा मार्गदर्शक वैभव सोनवणे, क्रीडा शिक्षक कुणाल देवरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.