साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची शाळेचे संस्थापक प्रशांत भीमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने इयत्ता नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल एस .एस. फॉर्म सटाणा येथे आयोजित करण्यात आली होती. शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे यांनी या सहलीसाठी पुढाकार घेतला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी एस. एस .फॉर्म मध्ये रेल्वेवर प्रवास करण्याचा आनंद लुटला. तसेच विद्यार्थ्यांनी रेन डान्स व बोटीमध्ये बसून, उद्यानामध्ये वेगवेगळे प्रकारचे खेळ झोके, घसर गुंडी, वजन काटा यांच्यावरही बसण्याचा आनंद लुटला. तसेच स्वादिष्ट व रुचकर नाश्ता व जेवणाचा आनंद लुटला.
तसेच इयत्ता दुसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल पिंपळगाव बसवंत हनी बी बसवंत गार्डन येथे आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी हनी बी बसवंत गार्डन (रिसॉर्ट) येथे विविध प्रकारच्या मधमाशींचे व त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून घेतले.
मधमाशा आणि वनस्पती यांच्यातील सहजीवनामुळे मानवाचे व वन्य जीवांचे कल्याण होते. मधमाशी आदर्श पर्यावरण सेवकाची भूमिका पार पाडते. मधमाशांच्या वसाहतीतील अन्न गोळा करणाऱ्या कामकरी मधमाशा फुलातून मकरंद गोळा करून मकरंद मकरंदाचे रूपांतर मधात करतात. ऊर्जेची समतोल देवाण-घेवाण करणारे सरस उदाहरण आहे.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत अविरत आठ ते दहा तासांपेक्षा जास्त काम करतात. एका फुलाकडून दुसऱ्या फुलाकडे पराग वाहून नेण्याचे काम मधमाशा करतात. अशा प्रकारे परागीकरणाची सेवा मानव व इतर प्राण्यांच्या अस्तित्वासाठी त्या विनामूल्य पुरवतात. सतत कामात मग्न राहून परोपकारासाठी मधमाशा झटतात. मोहोळातील मधमाशा एकजुटीने काम करतात आणि अमृततुल्य मधाची व उत्पादनाची निर्मिती करतात. मधमाशीचा वनस्पतीच्या फुलोर याला होणारा परिसर जैविक विविधता टिकविण्यासाठी कारणीभूत ठरतो म्हणजेच मधमाशी व वनस्पतीतील सहजीवन निसर्गासाठी संजीवकच होय. कुटुंबाच्या संरक्षणासाठी रक्षक मधमाशा शत्रूवर हल्ला करून एखाद्या योध्याप्रमाणे धारातीर्थी पडतात. आवश्यकतेपेक्षा जास्त अन्नाचा साठा मध करण्याची पद्धत आणि त्यासाठी सतत कार्यात मग्न अशा प्रकारची उद्यमशीलता मधमाशांमध्ये पाहायला मिळते. मधमाशांचे संगीत जीवन आणि संघटितपणे पिकांच्या फुलोऱ्यात अवरितपणे काम करण्याची पद्धत असते यातून त्या अमृततुल्य मधाची निर्मिती करतात. त्याचबरोबर परागीभवनही घडवून आणतात, अशी माहिती मिळवली. तसेच, या उद्यानामध्ये एका आदर्श गाव कसे असावे सर्व सुविधांनी युक्त असावे, या प्रतिकृतीचे निरीक्षण विद्यार्थ्यांनी केले. उद्यानामध्ये विविध प्रकारचे खेळ विद्यार्थ्यांनी खेळले. अतिशय स्वादिष्ट मधाचा व पेरू चा ज्यूसचा व रुचकर जेवणाचा आस्वाद विद्यार्थ्यांनी लुटला. या कार्यक्रमाचे संयोजन पुनम पवार, तेजस्विनी घरटे, कांचन अहिरराव, प्रफुल्ल साळुंखे यांनी केले.
सहलीमुळे विद्यार्थ्यांना रोजच्या अभ्यासातून विरंगुळा प्राप्त होतो. ज्या ठिकाणी पर्यटन करत आहात. त्या ठिकाणाविषयीची विविध माहिती मिळवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. विद्यार्थ्यांचे मनोरंजन होते. त्यांचे मन उत्साही व प्रसन्न होते. सहलीमुळे आपल्याला नवीन संस्कृती शिकायची, नवीन लोकांना भेटायची, वेगवेगळ्या ठिकाणी मज्जा करण्याची आणि साहसी कार्य करण्याची संधी मिळते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी वर्ग शिक्षक वर्ग, इतर कर्मचारी वर्ग व वाहन चालक वर्गांचे सहकार्य लाभले.