पिंपळनेर : येथील प्रचिती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी एसएस फार्म, सटाणा आणि हनी बी, पिंपळगाव याठिकाणी शुक्रवार, दि. १ मार्च रोजी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे चेअरमन प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे समन्वयक राहुल अहिरे, मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी सहलीचे नियोजन केले होते. लहान गट (एलकेजी ते पहिली) साठी आणि २ री ते ७ वी अशी एसएस फार्म, सटाणा आणि हनी बी, पिंपळगाव असे सहलीचे ठिकाण ठरवण्यात आले होते.
विद्यार्थी स्कूल बसने एसएस फार्मवर पोहोचले. चहा-नाश्त्यानंतर विविध खेळांचा आनंद घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध फळांची माहिती मिळाली. ग्रह, तारे आणि तारकांचे गाणे पाहून विद्यार्थी आनंदित झाले. दुपारच्या जेवणानंतर तलावातील मासे आणि कठपुतलीचे प्रदर्शन पाहून बसवंत पिंपळगाव येथे विद्यार्थ्यांनी ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घेतले.
विद्यार्थी हनी बी गार्डनला भेट देऊन मधमाशांच्या जगात रमून गेले. मधमाशांच्या पेट्या आणि मध उत्पादनाची प्रक्रिया पाहिली. मध आणि मधमाशी संबंधित लघुपटाद्वारे मधमाशांच्या जीवनाविषयी माहिती घेतली. सहलीमुळे विद्यार्थ्यांना मनोरंजनासोबतच शिकण्याचीही संधी मिळाली. ग्रामीण संस्कृती, मधमाशांचे जीवन, आणि विविध फळांची माहिती मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञानात भर पडण्यास मदत झाली. सहलीने विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि शिकण्याची आवड निर्माण झाल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त् केले.