प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त कार्यक्रम
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये दि. २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे, राजेंद्र राजपूत, रविंद्र सोनवणे, हेमांगी बोरसे, वैष्णवी थोरात यांच्या हस्ते सरस्वती माता प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक रवींद्र सोनवणे यांनी मराठी राजभाषा दिनानिमित्त माहिती देताना सांगितले की, २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस प्रख्यात कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा होतो. ते एक महान कवी, नाटककार, उपसंपादक तसेच कथालेखक सुद्धा होते. त्यांना पद्मभूषण बरोबरच अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या मागचा उद्देश म्हणजे आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिनाचा गौरव केला जातो. मराठी ही सर्वांग सुंदर भाषा असून भारतातील अधिकृत 22 भाषांपैकी एक भाषा आहे. या भाषेची निर्मिती संस्कृत पासून झाली आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ते म्हणतात” माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृता ही पैजा जिंके “अर्थात आपली मायबोली अमृताला ही पैजेत जिंकेल, असे मनोगत व्यक्त केले. शाळेचे संस्थापक प्रशांत भीमराव पाटील यांनी मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मातीला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच, शाळेचे शिक्षक राजेंद्र राजपूत यांनी मराठी राजभाषा दिनानिमित्त माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रातील जनतेसाठी हा अभिमानाचा आत्मीयेतेचा मराठी संस्कृतीचा व साहित्याच्या गुणगौरवाचा दिवस आहे. या दिवशी शाळेत महाविद्यालयात तसेच राजकीय संस्थेत मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्व पटवून दिले जाते. आपली मराठी मातृभाषा आहे. त्याचा प्रत्येकाला अभिमान वाटायला हवा. आपल्या मातृभाषेचे संवर्धन हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असायला हवे, असे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कुणाल पानपाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुंदर फलक लेखन भूपेंद्र साळुंखे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.