सुपे यांची इ प्रभाग सभापतीपदी बिनविरोध निवड
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इ प्रभाग समितीच्या सभापतीपदी नगरसेविका आशा सुपे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी त्यांना महापौर पद नाही किमान प्रभाग समिती सभापतीपद तरी मिळाले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इ प्रभागाच्या सभापती पदासाठी आज (सोमवारी) निवडणूक झाली. यासाठी आशा सुपे यांचा एकमेव अर्ज आल्याने आशा सुपे यांची बिनविरोध निवड झाली. स्थायी समितीच्या सभागृहामध्ये आज सकाळी 11 ते 12 या एक तासाच्या कालावधीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी निवडणूक अधिकारी नितीन पाटील व इ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी चंद्रकांत इंदलकर उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अ, ब, क, ड, इ आणि फ असे सहा क्षेत्रिय कार्यालय आहेत. इ प्रभागाच्या अध्यक्षा राष्ट्रवादीच्या नगरसेविका श्रद्धा लांडे यांनी महिन्याभरापूर्वी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. तेव्हापासून हे पद रिक्त होते. या पदासाठी सोमवारी इ प्रभाग कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. यावेळी फक्त नगरसेविका आशा सुपे यांनीच अर्ज केला होता. आशा सुपे यांनी महापौर पदासाठी त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीत प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना महापौर पद मिळाले नसले तरी जाता-जाता प्रभाग समिती सभापती पद मिळाले आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यामुळे त्यांना हे पद अल्प कालावधीत पुरतेच उपभोगता येणार असून त्याला मर्यादाही असतील.