धुळे : राष्ट्रीय आयुर्वेद परिषदेच्या आज दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर परिसंवाद झाले. यात राज्यभरातून आलेल्या वैद्यांनी आपली मते मांडली. त्याचप्रमाणे विविध वैद्यांनी लिहिलेल्या चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ‘आयुर्वेद की बात, नाना के साथ’ या परिसंवादाला उपस्थितांनी दाद दिली. धुळ्यातील प्रसिध्द वैद्य पी.टी. जोशी यांनी यावेळी परिषदेला उपस्थित वैद्यांसमोर आपले अनुभव कथन केले.
एस.एन. गुप्ता यांनी अन्ननलिकेशी संबंधित दोष आणि उपचार यावर मार्गदर्शन केले. आहार विहारामुळे आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम त्यांनी सांगितले. तेल आणि तूप वर्ज्य करावे म्हणून मी आयुष्यभर प्रयत्न केले. मात्र ते कमी होण्या ऐवजी त्याचा वापर वाढला हे दुर्दैव आहे असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे वैद्य एल.महादेवन यांनी पुरुष वंध्यत्व या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी स्त्री-पुरुषांचे एकमेकांशी असलेले संबंध, संभोग पध्दती, ब्रह्मचार्य व्रत आणि मुलांची जन्म प्रक्रिया यावर आपले मत व्यक्त केले. तर वैद्यकथन यांनी वात व्याधी यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. वाताची कारणे, शरिरात त्याचा होणारा प्रसार याबाबत त्यांनी आपले अनुभव सांगितले. त्यानंतर वैद्य पी.टी. जोशी यांनी त्यांच्या आयुष्यातील उपचार अनुभव, रुग्णांचे विविध आजार, त्यावर केलेली मात याबाबत त्यांनी संविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे संदीप पाटील, तुषार सूर्यवंशी, महेंद्र शिंदे, मनोज देशपांडे यांनीही यावेळी आपले अनुभव कथन केले.
आयुर्वेदाशी संबंधित चार पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे वैद्य पी.टी. जोशी यांच्या जीवन कार्यावर आधारीत स्मरणीका प्रकाशित करण्यात आली. राज्यभरातील तज्ज्ञ वैद्यांनी यावेळी हजेरी लावली होती.