पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील कॉंग्रेसचे मतदान राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाहिजे मग कॉंग्रेसचा उमेदवार का नको? असा प्रश्न पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी उपस्थित केला आहे. भाजपा सेनेसारख्या जातीयवादी पक्षांविरोधात लढा उभारताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी समविचारी पक्षांनादेखील बरोबर घेणे व त्यांचा आदर राखणे आवश्यक आहे. कॉंग्रेस राष्ट्रवादीचे जागा वाटप अद्याप झालेले नसतानाही शनिवारी काळेवाडी येथे झालेल्या मेळाव्यात शहरातील तीनही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस लढविणार असल्याचे अजित पवार यांनी जाहिर केले. त्यामुळे शहरातील काँग्रसचे कार्यकर्ते दुखावले आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना लेखी पत्राव्दारे कळविल्या आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष साठे यांनी दिली. निगडी प्राधिकरण येथे सचिन साठे यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेसच्या सर्व सेलच्या पदाधिका-यांची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती.
यावेळी माजी महापौर कविचंद भाट, सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, महाराष्ट्र प्रदेश अनूसूचित जाती कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्ष गौतम आरकडे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस मयूर जैसवाल, असंघटीत कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, ज्येष्ठ नागरिक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष किशोर कळसकर, सेवादल शहराध्यक्ष मकरध्वज यादव, एनएसयूआयचे शहराध्यक्ष वसिम इनामदार, पिंपरी चिंचवड अनुसूचित विभाग शहराध्यक्ष बाबा बनसोडे, अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, शहर उपाध्यक्ष क्षितिज गायकवाड, चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष संदेश बोर्डे आदींसह सर्व सेल व विभागाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघातील कोणतीही एक जागा कॉंग्रेस पक्षासाठी मिळावी यासाठी शहर कॉंग्रेसच्या वतीने कॉंग्रेसच्या वरिष्ठांकडे मागणी करण्यात आली आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनीदेखील मागील आठवड्यात पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शहरातील एक जागा काँग्रेससाठी घेतली जाईल असे सांगितले होते. तसेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील साठे यांच्याशी संवाद साधताना वेळोवेळी सांगितले होते. याबाबत कॉंग्रेसचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. परंतू कॉंग्रेसच्या मतदारांच्या व जुन्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून अजित पवार यांनी आत्मचिंतन करावे. मागील महानगरपालिका निवडणुकीत अशीच हटवादी भूमिका घेऊन कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वतंत्रपणे निवडणुका लढल्या. त्यावेळीझालेल्या मतदानाच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता कॉंग्रेस राष्ट्रवादीने एकत्र निवडणुका लढल्या असत्या तर, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या 15 ते 18 जागा आणि कॉंग्रेसच्या 10 ते 12 जागा वाढल्या असत्या व महानगरपालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आली नसती. शहरातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मागणीचा अजित पवार व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गांभीर्याने विचार करावा, असेही सचिन साठे यांनी सांगितले.