महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे काम सूरू
पिंपरी – शहराच्या विविध भागात मंगळवारी (दि. २४) रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. काही भागात महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने रात्री दोन पासूनच मदत कार्य सुरू केले असून अजूनही काही भागात पावसाचे व ड्रेनेजचे पाणी साचून आहे.
भोसरीतील आदीनाथ नगर, देवराई बिल्डींग, जाधववाडी, चऱ्होलीतील लक्ष्मीनगर, काळेवाडीतील आझाद कॉलनी तीन आदी परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. रात्री दहा ते अकराच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तसेच ड्रेनेजचेही तुंबल्याने पाण्याची पातळी वाढली. परिणामी स्वच्छतागृहाच्या माध्यमातून नागरिकांच्या घरात पाणी घुसले. अदिनाथ नगर परिसरात नाल्याची भिंत कोसळून पाण्याचा प्रवाहच लोकवस्तीत वळला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याबाबत महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय घुगे म्हणाले, परिसरात मदत कार्य सुरू असून कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. कोणत्या ठिकाणी नाल्याची, भिंतीची व पाईपची गरज आहे, याची माहिती घेऊन त्या दृष्टीने उपाययोजना केल्या जाणार आहेत.