पिंपरी – येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कन्या विद्यालय या शैक्षणिक संकुलाच्या वतीने पदमभूषण डॉ. भाऊराव पाटील यांच्या १३२ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, नवमहाराष्ट्र विद्यालयाचे मुख्यध्यापक उत्तमराव पाटील, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यपिका संगिता पडवळ यांच्या हस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणूकीस प्रारंभ झाला.
ढोल-लेझीम पथके, पारंपारिक वेशभूषेतील मावळे, सुवासिनी तसेच शेकडो विद्यार्थ्यांच्या समवेत सजविलेल्या चित्ररथातून कर्मवीर प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये पल्लवी पाचबोले या विद्यार्थीनीने तलवार बाजी व मर्दानी खेळाची उत्कृष्ट प्रात्येक्षिके सादर केली.
महाविद्यालय परिसर, पॉवर हाऊस चौक, अशोक थिएटर, कलानी बाग, जयहिंद हायस्कूल, गणेश हॉटेल चौक, तपोवन मंदिर मार्गे पिंपरी गाव येथे मिरवणूक आली. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांचे हस्ते अर्पण करण्यात आला. नगरसेविका निकिता कदम व ग्रामस्थ महिलांनी जागोजागी कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन केले व मिरवणूक संपन्न झाली.