केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षकांना वार्षिक बारा हजार रुपयांचे मानधन
राज्य शासनाच्या वित्त विभागाने घेतला निर्णय
पिंपरी:- भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदार केंद्रासाठी बीएलओ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यामध्ये बीएलओंची भूमिका महत्त्वाची आहे. निवडणुकीमध्ये मतदान केंद्रांची मदार असलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) एक हजार रुपयांची सुधारित मानधनवाढ मिळणार आहे. त्यामुळे त्यांना वार्षिक पाच ऐवजी सहा हजार रुपयांचे मानधन देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाने घेतला आहे.
अशी आहेत बीएलओंची कामे….
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविणे, विशिष्ट संवर्गाच्या मतदारांची नोंदणी यासाठी घरोघरी जाऊन मतदार नोंदणी करणे, तसेच वेळोवेळी आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांची विशेष माहिती गोळा करणे आदी कामे करण्यात येतात. छायाचित्र मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठीही मतदार नोंदणी अधिकारी यांना सहाय्य करणे, मतदार चिठ्ठीचे वाटप करणे, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित राहणे आदी कामे बीएलओ करीत असतात.
पर्यवेक्षकाची नेमणुक…
बीएलओंच्या कामाकाजाची देखरेख व मूल्यमापन करण्यासाठी दहा “बीएलओं’मागे एका पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांना वार्षिक बारा हजार रुपयांचे मानधन देण्याचे आदेशही या आदेशाद्वारे देण्यात आले आहेत.