पिंपरी : चिखलीतील आय. आय. बी. एम. कॉलेजमध्ये शुक्रवारी जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यटन क्षेत्रातील विविध व्यवसाय-रोजगार याबाबत विद्यार्थ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी विवन्ता ताज हॅाटेलचे व्यवस्थापक वर्षा कपूर, प्रशिक्षण व्यवस्थापक विवन्ता ताज हॅाटेलचे ओंकार गोलवलकर, टूर व्यवस्थापक वीणा वर्ल्ड ट्रावेल्स, (मा. क्रीडा सभापती) संजय नेवाळे, नगरसेवक कुंदन गायकवाड, नगरसेविका साधनाताई माळेकर, नगरसेवक जितू यादव, सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे, सामाजिक कार्यकर्ते कपिल यादव, तसेच आय आय बी एम ग्रुपचे संस्थापक डॉ. धनंजय वर्णेकर, संचालक राम रैना, आयआयबीएम कॉलेजच्या विभागप्रमुख डॉ. अनन्या गायकवाड, विभागप्रमुख अमोल भागवत, प्राध्यापक आदित्य वर्तक, गिरीश काटे, पिटर गोम, मुकूल होशिंग, अनिकेत वंजारी, एकता सिंग व सर्व विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते.
वर्षा कपूर म्हणाल्या की, डिजिटलदृष्ट्या प्रगत होत जाणार्या पर्यटन क्षेत्रासाठी, प्रत्येकास जागरूक करणे, डिजिटल व तंत्रज्ञानावर आधारित उद्योग-व्यवसायास चालना मिळावी, त्यामध्ये स्थानिकांचा समावेश व त्यांचे सशक्तीकरण करणे, पर्यटनासाठी माहितीचे आधुनिकीकरण करणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यटनामध्ये सुलभता आणणे यासारखी अनेक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून आजचा पर्यटन दिन साजरा केला जात आहे.
आयआयबीलएम ग्रुपचे संस्थापक डॉ. धनंजय वर्णेकर म्हणाले की, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे व मोबाईल आणि इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे आज जगभरातील कोणत्याही ठिकाणची माहिती सहज उपलब्ध होते. तसेच तेथे पोहोचण्यासाठी लागणारी प्रवास योजना व तेथे राहण्याची व्यवस्था ही घरबसल्या कोणाही मध्यस्थीशिवाय इंटरनेटच्या माध्यमातून आज आपण करू शकतो. त्यामध्ये होणार्या प्रगती व फायद्यासोबतच, येणार्या नवनवीन अडचणी, त्रुटी, दुष्परिणाम, फसवेगिरी यामध्येही भर पडत आहे. त्यामुळे त्यासाठी नवीन नियम-कायदे निर्माण करणे, जागरूकता व माहिती देणे यासारख्या अनेक उपाययोजना राबवून पर्यटनाच्या सशक्तिकरणासाठी येत्या वर्षभरात जागतिक, राष्ट्रीय व राज्य पातळीवर नक्कीच पाऊले उचलली जातील यात शंका नाही. विभागप्रमुख अमोल भागवत म्हणाले की, भविष्यात हॅाटेल इंडस्ट्री, पर्यटन क्षेत्र, एअरलाईन, जहाज या सेवा क्षेत्रामध्ये रोजगारच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यातून विद्यार्थी परदेशापर्यंत वाटचाल करू लागला आहे. त्यामुळे या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरसाठी विविध विभाग खुले आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयात विशेष प्राविण्य मिळविणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक पिटर गोम व नियोजन कॉलेजच्या विभागप्रमुख डॉ. अनन्या गायकवाड, अनिकेत वंजारी यांनी तर, आभार प्रदर्शन आय आय बी एम कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत सर यांनी केले.