पिंपरी : महापालिकेने नोटीस देऊनही अनधिकृत बांधकामे सुरू ठेवल्याचा आरोप करत चार जणांविरोधात सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत प्रभाकर देसाई (वय 47, रा. राजयोग कॉलनी, वाल्हेकरवाडी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, लालीदास तुकाराम ढोर आणि गोपीचंद तुकाराम ढोर (दोघेही रा. संत तुकाराम नगर, नवी सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी देसाई हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीस आहेत. 20 सप्टेंबर 2019 रोजी फिर्यादी देसाई यांनी लालीदास ढोर आणि गोपीचंद ढोर यांना नोटीस बजावून अनधिकृत बांधकाम थांबवून केलेले बांधकाम काढून घेण्यास सांगितले. मात्र ढोर यांनी अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवल्याचे फिर्यादीत सांगितले आहे. त्यानुसार त्यांच्या विरोधात महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम 379 (अ) (1)(ब) अन्वये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सांगवी पोलीस तपास करीत आहेत. महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाचे उपअभियंता आबासाहेब कृष्णाजी ढवळे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळासाहेब सर्जेराव करडे (रा. संत ज्ञानेश्‍वर नगर, थेरगाव) आणि वत्सला निवृत्ती कांबळे (रा. जगताप नगर, थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करडे यांना 6 जून 2019 रोजी तर कांबळे यांना 1 एप्रिल 2019 रोजी अनधिकृत बांधकाम थांबविणे व केलेले बांधकाम काढून घेण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, तरीदेखील त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले असल्याचे ढवळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार करडे आणि कांबळे यांच्या विरोधातही महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम 379 (अ) (1)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here