पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. विकासापेक्षा कुरघोडीचे राजकारण वाढल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे जावेद शेख यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे.
सध्याची राजकारणाची खालावलेली पातळी, सुडाचे राजकारण, विकासापेक्षा विरोधकांवर व्यक्तिगत कुरघोडी, सत्ताधार्यांकडून ज्येष्ठ विरोधकांना कमी लेखणे, हे सारे पाहून राजकारणाचा कंटाळा आला आहे. त्यामुळे राजकीय संन्यास घेऊन सर्वसामान्य जीवन जगण्याचा विचार आला आहे. आमचे नेते अजितदादा यांनी अशाच कारणास्तव राजीनामा दिल्याचे समजते. त्यामुळे आमचे मार्गदर्शक जिथे नाही तिथे आम्ही का थांबायचे ? त्यामुळेच मी नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे शेख यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच हा राजीनामा आयुक्त, महापौर यांच्याकडे सुपूर्द करावा. पक्षाने गेली 15 वर्ष संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले आहेत.