पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपला सत्ता आणायची आहे. सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसला हॅट्रीक करायची आहे. शहरात दोन खासदार व एक आमदार असलेल्या शिवसेनेलाही सत्तेला गवसणी घालायची आहे. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करायचे आहे, तर मनसेची लढाई अस्तित्वाची आहे. फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणे अपेक्षित आहे. आरक्षण व प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यादृष्टीने, ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेब्रुवारी 2017 मध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुकांचे ‘काऊंटडाऊन’ सुरू झाले आहे. सात ऑक्टोबरला प्रभागरचना व त्यानंतर आरक्षण जाहीर होणार असल्याने खर्या अर्थाने निवडणुकीतील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. गेल्या वर्षभरापासूनच राजकीय पक्षांची निवडणुकांच्या दृष्टीने वातावरणनिर्मिती सुरू आहे. आता त्या घडामोडी आणखी वेगवान होतील. आयाराम-गयारामची सुरूवात यापूर्वी झालीच आहे. त्यात आणखी उलथापलाथ होईल.
शहराच्या राजकारणातील अनपेक्षित अशी अनेक नावे आहेत, जी सध्याचा त्यांचा पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. भाजपमध्ये येणार्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्याखालोखाल, राष्ट्रवादीत जाऊ इच्छिणारे आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात सत्तासंघर्षाची लढाई होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी-भाजपचा सामना रंगला आहे. बड्या नेत्यांचा या निवडणुकीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध येणार असल्याने राज्यभरातील नेत्यांचे इकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला जिंकण्याचा पूर्णपणे निर्धार केला आहे. त्यादृष्टीने शहराध्यक्ष जगताप यांना हवी ती ताकद व मोकळीक देण्याचे धोरण त्यांनी ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांचा विश्वास सार्थ ठरवून भाजपची ताकद वाढवण्याचे काम ‘जगताप टीम’ने चालवले आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दोन वर्षापासून निर्माण केलेली संभ्रमावस्था आता संपुष्टात येणार असून, त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. लांडगे पक्षात येणार असल्याने भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. याशिवाय, भाजपचा दलित चेहरा म्हणून उदयास येत असलेले खासदार अमर साबळे आहेतच. जगताप, लांडगे आणि साबळे यांच्या माध्यमातून भाजपला पिंपरी-चिंचवडचा गड जिंकायचा आहे. दुसरीकडे अजित पवार, आझम पानसरे, अण्णा बनसोडे, संजोग वाघेरे, हनुमंत गावडे, योगेश बहल, मंगला कदम, डब्बू आसवानी अशी राष्ट्रवादीची तगडी ‘टीम’ आहे.
भाऊसाहेब भोईर व त्यांचे समर्थक नगरसेवकही राष्ट्रवादीत येणार, अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजपला वाटते तितकी विजयश्री सोपी नाही. याशिवाय, शिवसेना, काँग्रसे यांचे हक्काचे मतदान असलेले प्रभाग आहेत. तूर्त या पक्षांमध्ये शांतता पर्व सुरू असले, तरी त्यांची रणनीती तयार असणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे हे दोन खासदार व आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहूल कलाटे, गटनेत्या सुलभा उबाळे अशी नेतृत्वाची फळी असलेल्या शिवसेनेला महापालिकेत सत्ता प्रस्थापित करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यादृष्टीने त्यांची व्यूहरचना आहे; मात्र अपेक्षित प्रयत्न होत नाही.
काँग्रेसने एकेकाळी या शहरावर राज्य केले आहे. शहराचा सुरूवातीच्या काळात झालेला विकास ही काँग्रेसची देण आहे; मात्र आज काँग्रेसची अवस्था दयनीय आहे. त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे; मात्र शहराध्यक्ष सचिन साठे यांचे प्रयत्न एकाकी आहेत. भाजप-शिवसेनेची युती झाल्यासच काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होणार आहे. अन्यथा, जे विधानसभेच्या वेळी घडले, त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे. सगळे प्रमुख पक्ष आमने-सामने आल्यास खर्या अर्थाने जनमताचा कौल दिसून येणार आहे.
राज ठाकरे यांच्या मनसेचे गेल्या निवडणुकीत अनपेक्षितपणे चार नगरसेवक निवडून आले. ते संख्याबळ मनसेला टिकवून धरता येईल की नाही, याविषयी साशंकताच आहे. मनसेचे दोन नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. चार सदस्यीय प्रभाग पध्दतीने होणार्या निवडणुकीत आपला निभाव लागणार नाही, अशी अनेकांची भावना आहे.
मनसे कोणाशी युती करेल, अशी शक्यता तूर्त तरी नाही. त्यामुळे मनसेची लढाई अस्तित्वासाठी असेल. रिपाईला भविष्यात आमदार निवडून आणायचा आहे, त्यादृष्टीने ताकद वाढवण्याचा प्रयत्न या निवडणुकीतून होणार आहे. सर्वच पक्षांची तयारी सुरू आहे. आरक्षण व हद्दी स्पष्ट झाल्यानंतर खर्या अर्थाने निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे.
——————–
– चौफेर
विशेष संपादकीय