‘बच्चोंकी मन की बात, प्रधानमंत्री के साथ’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : भारतीय टपाल खात्याच्या पुणे शहर पूर्व विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील व चिंचवड भागातील शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादर लाभला.
टपाल विभागाचे पूणे शहर पूर्व विभागाचे प्रवर अधीक्षक अभिजीत बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा घेण्यात आली. गणेश वडूरकर, रत्नाकर वेदपाठक, उपविभागीय निरीक्षक प्रकाश कांबळे, रंगनाथ डगळे, संपत डूंबरे, क्षीरसागर आणि श्री. रासकर आदी या वेळी उपस्थित होते.
पुण्यातील मार्केट यार्ड येथील कटारिया इंग्लीश मीडियम हायस्कूल, महावीर इंग्लीश मीडियम हायस्कूल, चिंचवड येथील संचेती इंग्लीश मीडियम स्कूल आणि सरस्वती विश्व विद्यालय या शाळांतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
‘मन की बात’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला एक अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमाव्दारे सर्वसाधारण जनतेशी नियमित संवाद साधून सरकारच्या विविध योजनांबद्दल माहिती देण्यात येते. या संदर्भात शालेय विद्यार्थी या उपक्रमात सहभागी करून त्यांची मते मांडण्याची संधी देण्यासाठी ‘बच्चोंकी मन की बात, प्रधानमंत्री के साथ’ ही संकल्पना टपाल विभागाने मांडली. पंतप्रधान यांच्या एका कार्यक्रमातील विषयास अनुसरून ‘सकारात्मकता ही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे’ हा विषय विद्यार्थ्यांना पत्र लेखनासाठी देण्यात आला होता. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून पहिल्या तीन क्रमांकांना टपाल खात्यातर्फे बक्षीस देण्यात येईल.