ज्यांची पक्षात घुसमट होत असेल, त्यांनी खुशाल पक्ष सोडून जावे, अशी तंबी अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी स्वकीयांना उद्देशून दिली होती. आता, जे पक्ष सोडून जात आहेत, त्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत आणि योग्य वेळी त्या मी बाहेर काढेन, असा सूचक धमकीवजा इशारा त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या न थांबणार्या गळतीमुळे अजित पवार यांनी ही भाषा सुरू केली; मात्र खरोखरच अजित पवार इतरांच्या कुंडल्या काढतील की, खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटल्याप्रमाणे पाटबंधारे खाते आणि सहकार खात्यातील व्यवहारावरून अजितदादांच्या कुंडल्या काढल्या जाणार, हा प्रश्नच आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय पिंपरी-चिंचवडचे राजकारण नाही. अजित पवार आणि पिंपरी-चिंचवड असे समीकरण गेल्या 25 वर्षांपासून आहे. बारामती लोकसभेचे उमेदवार म्हणून सर्वप्रथम अजितदादांचा या शहराशी संबंध आला. हळूहळू तो वाढत गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार अजितदादांच्या हाती सोपवला, तेव्हापासून ते एका अर्थाने पिंपरी-चिंचवडकर झाले.
सुरूवातीला रामकृष्ण मोरे यांच्यासह स्थानिक काँग्रेस नेत्यांशी जुळवून घेत व नंतर राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर स्वतंत्रपणे कार्यभार सांभाळत अजितदादांची शहराच्या राजकारणात दमदार वाटचाल सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या 10 वर्षांत निर्विवाद सत्ता आहे. अजितदादा बोले आणि पिंपरी-चिंचवड महापालिका डोले, अशी परिस्थिती आहे. अजितदादांच्या या एकाधिकारशाहीचा शहराला कधी फायदा झाला, तर कधी तोटाही झाला. फायदा असा की, शहरातील विकासकामांचे निर्णय झटपट होत गेले आणि त्याची अंमलबजावणीही तातडीने होत गेली. विकासकामांमध्ये विरोध असा झाला नाही. आज शहराचा जो कायापालट झाला आहे, त्याचे अजितदादांच्या हाती असलेला एकहाती कारभार हेच महत्त्वाचे कारण आहे. आणि तोटा हा की, या एकाधिकारशाहीमुळे अजितदादा कोणाला मोजतच नाहीत. जे काही करायचे ते स्वत:च्या मनाने करतात. काही वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडचे नाव बदलून ‘न्यू पुणे’ करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता. हेच उदाहरण पुरेसे बोलके आहे; मात्र शहरवासीयांकडून झालेल्या तीव्र विरोधामुळे तो विचार त्यांना मागे घ्यावा लागला.
अजितदादा एके अजितदादा, असे शहरातील राजकारण आता बदलू लागले आहे. आतापर्यंत बलाढ्य मानल्या जाणार्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तितकीशी ताकद राहिली नाही. गेल्या काही दिवसांपासून पक्षाला गळती लागलेली आहे आणि काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडल्याचे चित्र पुढे येणार आहे. दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर लक्ष्मण जगताप पक्ष सोडून गेले आणि भाजपमध्ये जाऊन पुन्हा आमदार झाले. आता भोसरीतील अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे आणि ते भाजपमध्ये जाण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. जगताप आणि लांडगे यांचे मोठ्या संख्येने असलेले समर्थक लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत. ज्या दिवशी हे पक्षांतर होईल, त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकृतपणे भगदाड पडलेले असेल. हे सर्व चित्र इतके स्पष्ट आहे की, ते रोखता येणार नाही, याची जाणीव खुद्द अजितदादांनाही आहे. त्यामुळेच त्यांची चिडचीड होत असावी आणि त्यामुळेच त्यांनी कुंडल्या काढण्याची भाषा केली असावी, असे मानले जाते.
महापालिकेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी नुकतेच ते चिंचवडला आले होते. तेव्हा पत्रकार परिषदेत बोलताना, जे पक्ष सोडून चालले आहेत, त्या सर्वांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत आणि योग्यवेळी बाहेर काढेन, असे सूचक विधान करत त्यांनी भविष्यातील इरादे स्पष्ट केले. अजितदादांनी अनेकांना नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर आणि आमदार केले. त्यातील अनेकजण पक्ष सोडून जात आहेत, अशांना उद्देशून त्यांनी कुंडल्या काढण्याचा धमकीवजा इशारा दिला आहे. वास्तविक, अजितदादांवर ही वेळ का आली, याचा विचारही व्हायला पाहिजे. अजितदादांच्या जीवावर अनेक जण ‘गबर’ झाले. अजितदादांची तळी भरून स्वत:चे उद्योग मांडले, खिसे भरले; मात्र पक्षाची संघटनात्मक वाढ होऊ दिली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे स्वत:चे सवतासुभे आहेत. हे सुभेदार नेतेच अजितदादांना डोईजड झाले असून, नेत्यांच्या गटबाजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘तीन तेरा’ झाले आहेत. कार्यकर्त्यांचा थेट अजितदादांपर्यंत संबंध येऊ दिला जात नाही. त्यांच्या निष्ठा स्थानिक नेत्यांपर्यंतच राहतात. मग, निर्णायक क्षणी कार्यकर्त्यांना स्थानिक नेत्यांचीच तळी उचलावी लागते. पक्ष सोडून जाणार्यांची सध्या तीच अवस्था आहे. अजितदादांनी तिकीट दिले, निवडून आणले, महापालिकेतील पदे दिली. हे माहिती असतानाही अनेकांनी त्यांची साथ सोडून जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यातूनच दादांनी ‘कुंडली’विधान केले आहे; मात्र अजितदादाही चौकशीच्या फेर्यात आहेत. पाटबंधारे आणि शिखर बँकेतील व्यवहारावरून त्यांची चौकशी सुरू आहे. खासदार किरीट सोमय्या ज्या पद्धतीने छगन भुजबळ यांच्याबाबतीत भाकीते करत होते. त्याचपद्धतीने ते सातत्याने अजितदादांविषयी बोलत आहेत. त्यामुळे जसे अजितदादा इतरांच्या कुंडल्या काढण्याच्या तयारीत आहेत; तसेच कुणीतरी दादांच्याही कुंडल्या काढण्यास उत्सुक आहे, हेही तितकेच खरे.