उच्चस्तरीय बैठकीत निर्णय; ना. डॉ. सुभाष भामरे यांची माहिती
धुळे : जिल्ह्यावासीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या मनमाड-धुळे-इंदूर मार्गे मालेगाव रेल्वे मार्गासाठी रेल्वे मंत्रालय, रस्ते आणि जहाज दळणळण मंत्रालयात संयुक्त करार होणार आहे. रेल्वे आणि जहाज बांधणी मंत्रालयाच्या विद्यमाने साकारला जाणारा हा देशातील पहिला प्रकल्प आहे, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्याचे खा. डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे. याबद्दल त्यांनी धुळेकरांच्या वतीने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहेत.
मनमाड-धुळे-इंदूर व्हाया मालेगाव रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी एकूण 10 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. या एकूण निधीपैकी 5 हजार कोटी रुपयांची तरतूद रेल्वे बजेटमध्ये करण्यात आली आहे. उर्वरित निधी महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकारने द्यावयाचा होता. महाराष्ट्र सरकारने निधी देण्यास संमती दर्शविली. परंतु, आर्थिक अडचणीवर तोडगा काढण्यासाठी ना. डॉ. सुभाष भामरे यांनी प्रयत्न सुरू ठेवले. याबाबत रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. रेल्वे मंत्रालय व पोत मंत्रालय यांच्या संयुक्त निधीतून हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यासाठी रेल्वे मंत्रालय व जहाज बांधणी मंत्रालयात बैठक घडवून आणण्यासाठी तीन ते चार महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर त्यास यश आले असून, रेल्वेमंत्री ना. सुरेश प्रभू, ना. नितीन गडकरी, ना. डॉ. सुभाष भामरे व दोन्ही मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारी यांच्यात बैठक झाली.
बैठकीत दोन्हीही मंत्रालयांनी संयुक्तरित्या मनमाड- धुळे- इंदूर व्हाया मालेगाव मार्ग करण्याचा निर्णय घेतला. याबाबत दोन्ही मंत्रालयांमध्ये लवकरच करार होणार आहे. या रेल्वे मार्गासाठी पोत मंत्रालय 5 हजार कोटी रुपयांचा निधी देणार आहे. रेल्वे मंत्रालय आणि पोत मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने रेल्वेमार्ग होण्याची ही भारतातील पहिली घटना ठरेल, असेही ना. डॉ. भामरे यांनी म्हटले आहे.
मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी दोन मंत्रालयात होणार करार
