पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप झाला, असे आरोप-प्रत्यारोप सध्या सत्ताधारी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सुरू आहेत. मात्र, दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी केवळ राजकीय स्टंटबाजी सुरू असल्याची टिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष दीपक मोढवे पाटील यांनी केली आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यांत धूळफेक केली जात आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक विभागाने सत्य उघड करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे आणि निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत माने यांना निवेदन देण्यात येणार आहे. प्रारुप प्रभाग रचनेबाबत सोडत जाहीर केल्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये घमासान सुरू झाले आहे.
एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्यनिवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वीच दोन दिवस अगोदर राजकीय पदाधिकारी- कार्यकर्त्यांपर्यंत आराखडा पोहोचला होता. याचा अर्थ राजकीय हस्तक्षेप झाला हे
उघड होते.
मात्र, एकमेकांवर आरोपकरून वेळ मारून नेण्याची भूमिका राष्ट्रवादी आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी घेत आहेत. त्यामुळे प्रभाग रचना करीत असताना निवडणूक आयोगाचे नियम, संकेत पायदळी तुडविण्यात आले आहेत का, असा प्रश्नही दीपक मोढवे-पाटील यांनी उपस्थित
केला आहे.
हस्तक्षेप लोकशाहीला घातक…
प्रभाग रचना करीत असताना आपल्या सोयीचे प्रभाग जोडणे किंवा तोडणे ही बाब चिंताजनक आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेप करून राजकीय पदाधिकार्यांनी लोकशाही व्यवस्थेलाच आव्हान दिले आहे. अशाप्रकारे उलथा-पालथ होणार असेल, तर निवडणुका कशासाठी घ्यायच्या, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. निवडणूक कामात वाढता हस्तक्षेप लोकशाहीसाठी घातक ठरत आहे, अशी खंतही मनसे शहर उपाध्यक्ष दीपक मोढवे पाटील यांनी व्यक्त
केली आहे.