यंदा पाच तृतीयपंथीय उतरणार पिंपरी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात
पिंपरी : जर आम्ही मतदान करु शकतो तर आम्ही निवडणूक का नाही लढवू शकत, तो अधिकार आम्हाला संविधानाने दिला आहे. त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढवणार असल्याचे तृतीयपंथीयांनी पत्रकारपरिषदेत जाहीर केले.
या निवडणूकीत किरण हुबळीकर, दस्तगीर सय्यद, पुजा ओंबारे, पंकज बोकील, दलजीत सिंग हे पाच तृतीयपंथी पिंपरी-चिंचवडच्या दापोडी, खराळवाडी, काळेवाडी, थेरगाव, चिखली या पाच ठिकाणावरून निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांना निवडणूक लढविण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, समाजात स्त्री व पुरुष अशा दोनच ओळखी असतात आमची ओळख का नसते, आधार कार्ड, मतदान कार्ड येथेही अन्य किंवा इतर असा पर्याय असतो. तृतीयपंथी असा पर्याय का नाही ठेवत. आज आमच्या मागण्यांसाठी कोणीही पुढे येत नाही त्यासाठी आता आम्हीच निवडणूक लढवणार आहोत. आत्तापर्यंत नगरसेवकांचे उंबरठे झिजवले पण कोणीही पुढे आले नाही.
स्वच्छतागृहापासून ते दवाखान्यापर्यंत केवळ स्त्री व पुरुष एवढेच पर्याय असतात. आम्हाला कुठेच स्थान नसते, स्त्रीयांच्या येथे गेले तर त्यांना त्रास होतो, तर पुरुषांना आम्ही नको असतो. साध कुठल्या रांगेमध्ये उभारायचे झाले तरी स्त्री-पुरुष एवढेच पर्याय असतात त्यामुळे आम्हाला आता निवडणुकांमध्ये उतरायचे आहे.
काय आहेत त्यांच्या मागण्या?
1. दवाखान्यात त्यांच्यासाठी राखीव बेड किंवा विभाग हवा
2. घरकूल योजनेत त्यांनाही घरे हवीत
3. आधारकार्ड, मतदानकार्ड आदींसाठी अन्य किंवा इतर असे पर्याय न ठेवता तेथे तृतीयपंथी म्हणून नाव ठेवा.
4. समाजात स्त्री-पुरुष प्रमाणे आम्हालाही स्थान द्या
5. इतर पक्षांना उमेदवारी देण्याचे आव्हान
6. राजकिय नेते समाज सेवा करण्याची भाषा करतात तर त्यांनी आम्हाला उमेदवारी देऊन दाखवावी तर आम्ही त्यांच्या समाजसेवेला मान्य करू, उमेदवारी दिली निवडणून आलो तर आमचा पूर्ण समाज त्यांच्या पाठीशी असेल. त्यामुळे इतर पक्षांनी आम्हाला उमेदवारी द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही अपक्ष लढवू अशी तयारीही त्यांनी यावेळी दर्शवली.
दलजित सिंग यांनी रहाटणी भागातून 2007 सालीही निवडणूक लढवली होती, त्यावेळी त्यांना 650 मते मिळाली होती. यावेळी तरी जनतेने आमचे आस्तित्व मान्य करावे, आम्ही कोणाच्या तोंडचा घास घेत नाही आहोत तर आमचा हक्क आम्ही मागत आहोत. आम्हाला समाजाने प्रोत्साहन दिले तर आमचाही विकास होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.