पिंपरी : स्वच्छतेच्या बाबतीत राज्यात पहिला व देशात नववा क्रमांक मिळालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राज्यातील 44 नगरपालिका व महापालिकांना स्वच्छतेचे धडे देणार आहे. यासाठी खास स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत देशात स्वच्छ सर्व्हेक्षण 2017 चे अभियान सुरू करण्यात येणार आहे. त्यांसदर्भात माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात होणार्या या कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी 10 वाजता महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी राज्य स्वच्छता अभियानाचे संचालक डॉ. उदय टेकाळे, स्मार्ट सिटी, अमृत व स्वच्छ भारत अभियानाच्या राज्य कार्यकारी संचालक सीमा ढमढेरे यांच्यासह राज्यातील 26 महापालिका व 18 नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.
या अभियानाची राज्यातील महापालिका व नगरपालिका अधिकार्यांना सविस्तर माहिती व्हावी, या उद्देशाने ही एकदिवसीय कार्यशाळा होत आहे. यामध्ये स्मार्ट सिटीत निवड झालेल्या व इतर महापालिका व नगरपालिकेतील स्मार्ट सिटी, अमृत अभियान व स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी नामनिर्देशित केलेले एक समन्वय अधिकारी, एक तांत्रिक असे दोन अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या अधिकार्यांना ’स्वच्छ सर्वेक्षण 2017’ ची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.