सर्व सोयी, साहित्य दिल्याचा प्रशासनाकडून दावा
स्वेटरचे मात्र वेळेच्या आधी 100 टक्के वाटप
स्वेटरचे वाटप 15 ऑगस्टनंतर सुरू करण्यात आले होते. त्यानुसार आज अखेर तीन महिन्यात 100 टक्के स्वेटरचे वाटप झाल्याचे प्रशासनाने दावा केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना थंडी आधी स्वेटर मिळाले याचा जास्त आनंद आहे. सध्या सर्वच शाळांमध्ये सहामाही परीक्षा चालू असून येत्या सोमवारी (दि.24) तारखेला शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या लागणार असून 15 दिवसानंतर म्हणजे 9 नोव्हेंबरनंतर शाळा पुन्हा भरणार आहेत.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शिक्षणमंडळ म्हणजे नेहमी वादातीत राहिलेला विभाग. तीच परंपरा पुढे चालू ठेवत यावेळीही शिक्षण मंडळाने सहामाही संपत आली तरी 100 टक्के बूट व सॉक्सचे वाटप केले नाही. एवढे कमी की काय म्हणून शिक्षणमंडळाने परिक्षेमध्ये उत्तरपत्रिका दिल्या नाहीत, अशी तक्रार पालकांकडून करण्यात येत आहे.
यावर बोलताना शिक्षणमंडळ प्रशासन अधिकारी भाऊसाहेब कारेकर म्हणाले की, आम्ही यावेळी आमच्याकडे शाळांमध्ये जुन्याच उत्तरपत्रिका उपलब्ध होत्या. त्याच आम्ही वापरल्या. त्या पुरेशा होत्या तशा सूचनाही आम्ही दिल्या होत्या. तसेच बुटांचे वाटपही झालेले आहे, असे म्हणत सा-या तक्रारीच प्रशासनाने धुडकावून लावल्या.
मात्र, प्रत्यक्षात नागरिकांनी माध्यमांकडे स्वतःहून येत तक्रारी केल्या आहेत की, परिक्षेत विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणामुळे उत्तरपत्रिका उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे देऊ शकत नाही, असे उत्तर दिले. तसेच शाळांना आता सोमवारपासून सुट्ट्या लागणार असून बूट व सॉक्सचे आज अखेरपर्यंत 100 टक्के वाटप झालेले नव्हेत. बूट व सॉक्स वाटपासाठी अखेरची मुदत ही 8 ऑगस्ट 2016 ही होती. मात्र, आता ऑक्टोबर उजाडला तरी 6 ते 7 शाळांना आज घाई-घाईत वाटप सुरू होते. त्यामुळे रेनकोट मिळाला तर वही नाही व वही मिळाली तर बूट नाही. त्यामुळे शिक्षणमंडळ बरखास्त व्हायला आले तरी तक्रारी काही संपेना असे चित्र आहे.