आ. शिंदे यांची सरकारवर टीका; सातारा मित्रमंडळाचा कार्यकर्ता गुणगौरव सोहळा
पिंपरी : सध्या राज्यात अशांतता व अविश्वासाचे वातावरण आहे. कायद्यामध्ये बदल होत
आहेत. नोकरीची शाश्वती नाही.
उद्योजक नाराज असून, कामगारही देशोधडीला लागले आहेत. इंजिनिअरिंग झालेल्यांना बेठबिगाराचे काम करावे लागत आहे. त्यामुळे सध्याच्या सरकारपेक्षा ब्रिटिशांची राजवट बरी म्हणण्याची वेळ आली आहे. छत्रपती
शिवाजी महाराजांचे नाव घेऊन
सत्तेवर आलेले आज राज्याला लुटत असल्याची टीका आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.
सातारा जिल्हा मित्रमंडळ व पश्चिम महाराष्ट्र युवा मंचच्या वतीने मंडळातील कार्यकर्त्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. आकुर्डी खंडोबा माळ मंदिर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात आमदार शिंदे यांच्या हस्ते कार्यकर्त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या वेळी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बाजार समितीचे सभापती बाळासाहेब सोळस्कर,
नगरसेवक दत्ता साने, जितेंद्र पवार, धनंजय पाटील, एकनाथ थोरात, नगरसेविका वनिता थोरात, माजी नगरसेवक मारुती भापकर, संस्थापक सुनील जाधव, अध्यक्ष गोपीचंद जगताप, रमेश चव्हाण, धनंजय मोरे, सोमनाथ शिंदे, रणजित आवटे आदी या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘पुढारी’चे उपवितरण व्यवस्थापक विजय जाधव यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला; तसेच कामगार प्रतिनिधी अनिल कवठेकर, किरण देशमुख, शंकर जाधव, ऍड. विक्रम यादव आणि ऍड. सुनील आव्हाळे यांच्यासह 95 कार्यकर्त्यांचा सपत्नीक, 12 महिला कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
आमदार शिंदे म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील नागरिक इतर विविध जिल्ह्यांत कामासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा मित्रमंडळाला महाराष्ट्राची व्याप्ती मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्र युवा मंचच्या वतीने सत्ताधार्यांची खुर्ची हलविण्याचे काम
करायला हवे.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले की, मंडळाच्या विविध कार्यक्रमांतून एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे. भविष्यात एकत्र मंडळाकडून निश्चित चांगले काम केले जाईल. सुनील जाधव म्हणाले की, सामान्य लोकांचे ऋण फेडण्यासाठी हा सन्मान करण्यात आला आहे. योग्य कामे केल्यास मंडळे जिवंत राहतात. मंडळाच्या वतीने महात्मा फुलेंच्या जयंतीदिनी शिक्षकदिन साजरा करण्यात येणार आहे. या वेळी 101 शिक्षकांचा सत्कार करणार आहे. गोपीचंद जगताप यांनी प्रास्ताविक केले. राजाराम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी केणसे यांनी आभार मानले.
छत्रपतींचे नाव घेऊन राज्याची लूट
