माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरी-चिंचवडची सत्ता कायम ठेवण्यासाठी यंदा बराच काथ्याकूट करावा लागणार, असे दिसते. अजितदादांना नदीपल्याडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीवाले आमदार महेश लांडगे यांच्या संयुक्त ताकतीला सामोरे जावे लागणार आहे. एकेकाळी अजितदादांचे शिष्य असलेले हे दोन्ही भूमीपुत्र गुरूशीच दोन हात करणार आहेत. यात कोणाचा विजय होणार आणि कोणाला पराभूत व्हावे लागणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. मात्र, तोपर्यंत पिंपरी पालिकेचा सत्तासंघर्ष चांगलाच रंगणार आहे.
जे राष्ट्रवादी सोडून दुसर्या पक्षात चालले आहेत, त्यांच्या योग्य वेळी कुंडल्या बाहेर काढणार असल्याचे बहुचर्चित विधान अजित पवार यांनी केले, ते उगीचच किंवा अजाणतेने केले नव्हते. कारण, परिस्थितीच अशी आहे की, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची बाजू वरचढ ठरणार्या अनेक गोष्टी एकामागोमाग होत आहेत आणि त्या कोणत्याही परिस्थितीत थोपवता येत नाहीत, हीच अजितदादांची हतबलता आहे. अजितदादांचे जवळचे म्हणून ओळखले जाणारे आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली, तेव्हा अजितदादांना सर्वप्रथम धक्का बसला होता. पवार यांच्या जीवावरच जगताप मोठे झाले, हे कोणीही अमान्य करणार नाही.
लक्ष्मण जगताप यांच्या पाठोपाठ, ज्यांना राष्ट्रवादीने पदे दिली, असे अनेक कार्यकर्ते भाजपवासी झाले आणि आता त्यात आमदार महेश लांडगे यांची नव्याने भर पडली आहे. राष्ट्रवादीच्या तिकीटावर लांडगे तीन वेळा नगरसेवक झाले, मोक्याच्या क्षणी स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. राष्ट्रवादीच्या खेळपट्टीवर त्यांनी त्यांच्या आमदारकीची धावपट्टी तयार करून घेतली, पुढे त्याचाच उपयोग करून ते आमदार झाले. आमदार झाल्यानंतर दोन वर्षे तळ्यात-मळ्यात अशी त्यांची द्विधा मनस्थिती वाटत होती. मात्र, ऐन निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. चिंचवड मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांची वैयक्तिक अशी ताकद आहे. यापूर्वीच्या पालिका सभेत त्यांच्या विचारांचे 25 नगरसेवक आहेत, असे सांगण्यात येते. त्याचपध्दतीने, महेश लांडगे यांची भोसरीत निर्विवाद ताकद आहे. केवळ भोसरीच नव्हे तर लगतची गावे, वाड्या-वस्त्यांवर त्यांची क्रेझ आहे. विधानसभा निवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले. जगताप आणि लांडगे आता भाजपच्या तंबूत दाखल झाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात धास्तीचे वातावरण आहे आणि तीच धास्ती, तीच हतबलता अजितदादांच्या ‘कुंडली’ वक्तव्यातून दिसून आली.
पिंपरी पालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत त्या जिंकण्यासाठी सर्वच पक्ष आतूर आहेत. तरीही, खर्या अर्थाने राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातच रस्सीखेच सुरू असल्याचे सध्याचे चित्र आहे. भाजपकडे सध्या फक्त आणि फक्त आयात सुरू आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेसह आदी पक्षातून दरदिवशी कोणाचा ना कोणाचा प्रवेश सुरू आहे. त्यात कसदार माल किती आणि रद्दी किती, हा संशोधनाचा विषय आहे. त्याचपध्दतीने, राष्ट्रवादीत येणारेही ऐनवेळचे पाहुणेही तयार आहेत. आगामी काळात काँग्रेसमध्ये मोठे खिंडार पडणार असून ती सर्व मंडळी राष्ट्रवादीत येणार आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून आतापर्यंत अजित पवार विरूद्ध लक्ष्मण जगताप यांच्यात सत्तासंघर्ष रंगणार, असे वातावरण राजकीय वर्तुळात होते. आता त्यात थोडासा बदल झाला आहे. आता अजितदादा विरूध्द लक्ष्मण जगताप व महेश लांडगे अशा द्वयीचा सामना रंगणार आहे. जगताप यांच्याकडे चिंचवड मतदारसंघाची, लांडगे यांच्याकडे भोसरी मतदारसंघाची तर पिंपरी मतदारसंघाची जबाबदारी खासदार अमर साबळे यांच्याकडे राहणार आहे.
भाजपची सर्व भिस्त भोसरी व चिंचवड परिसरातून निवडून येणार्या जागांवर अवलंबून आहे. कारण, पिंपरी मतदारसंघात भाजपची स्थिती फारशी चांगली नाही. पिंपरीत राष्ट्रवादीचा वरचष्मा आतापासूनच दिसतो आहे. या भागाचा आमदार शिवसेनेचा आहे. मात्र, शिवसेनेचा प्रभाव मात्र जाणवत नाही. भाजप खासदाराच्या वाटणीला पिंपरीचा भाग असला तरी भाजपला पिंपरीत पोषक वातावरण नाही. राष्ट्रवादीचे जेवढे म्हणून ताकतीचे नेते आहेत, ते बहुतांश पिंपरी मतदारसंघात आहेत.
पिंपरी मतदारसंघातील प्रभागरचना राष्ट्रवादीच्याच सोयीची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची भिस्त पिंपरीवर राहणार आहे. असे असले तरीही या निवडणुकीत राष्ट्रवादीची एकूणातील सदस्यसंख्या निश्चितपणे कमी होणार असून भाजपची संख्या हमखास वाढणार आहे. काँग्रेस आणि शिवसेनेला आपल्या संख्याबळात वाढ करण्यासाठी बरेच परिश्रम करावे लागणार आहे. मनसेचे गणितही तसेच आहे. चारचे चौदा करण्याची मनसेची कितीही मानसिकता असली तरी प्रत्यक्ष तसे वातावरण नाही. या निवडणुकीत कोणाचा विजय होणार, हे आताच सांगता येणार नसले तरी तरी गुरू विरूद्ध त्यांचे शिष्य यांच्यातील सामना मात्र खूपच रंगतदार
होणार आहे.