पिंपरी ः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे प्रभाग प्रारुप आराखड्यावर अखेर तब्बल 1 हजार 430 हरकती नोंदवल्या आहेत. त्यामध्ये 1300 हरकती केवळ तळवडे परिसरातील नागरिकांच्या आहेत, अशी माहिती निवडणूक विभागाचे प्रमुख यशवंत माने यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निवडणूक कार्यक्रमपत्रिकेनुसार 10 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरपर्यंत प्रभाग प्रारुप आराखड्यावर हरकती नोंदविण्यात येणार होत्या त्यानुसार निवडणूक शेवटच्या दिवशी निवडणूक विभागाकडे 1 हजार 400 हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. यामध्ये आमदार महेश लांडगे यांनी भोसरी व मोशीतील दोन प्रभागांबाबत हरकती घेतल्या आहेत. तसेच, नगरसेवकांपैकी निता पाडाळे, अरुण टाक, मंदाकिनी ठाकरे, धनंजय आल्हाट, आशा सूर्यवंशी, सुभद्रा ठोंबरे, वंसत लोंढे यांनीही निवडणूक विभागाकडे हरकती नोंदविल्या आहेत.
यामध्ये प्रभाग रचना नियमाला धरून झाली नाही. त्यात नैसर्गिक सीमांचे पालन केले गेले नाही या स्वरुपाच्या या तक्रारी आहेत. तळवडे परिसरातील नागरिकांनीही तळवडे ग्रामपंचायतीपासून चालत आलेला गावठाण परिसर दुस-या प्रभागात दिला असून तळवडेला चिखली परिसर जोडला असल्याची तक्रार
केली आहे.
निवडणूक विभाग आता हरकतीवरील सुनावणीसाठी वेळ व स्थळ निश्चित केल्यानंतर हरकत दारांना त्यासंबंधी नोटीस पाठवणार असून व राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमपत्रिकेनुसार 4 नोव्हेंबरला या हरकतींवर सुनावणी करण्यात येईल.