विधान परिषद निवडणुकीत विलास लांडे यांचा माघारीचा कांगावा खोटा असल्यास आणि त्यांनी खरोखर निवडणूक लढवली, तर ते विजयी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेत 128 नगरसेवक आहेत. त्यातील 25 नगरसेवक लांडे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांनी शिरूर लोकसभा निवडणूक लढवली असल्याने या पट्ट्यातील सदस्यांशी त्यांचा थेट परिचय आहे. जिल्ह्यात त्यांचे नातेवाईकांचे मोठे जाळे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतांची खरेदी करण्याची वेळ आलीच, तर त्यांचा चांगलाच हातखंडा आहे. लांडे यांची आर्थिक सुबत्ता पाहता ते बाजारभावापेक्षा जास्त भाव मतदाराला देऊ शकतात, इतकी त्यांची ऐपत नक्कीच आहे. अनेक नगरसेवक मतदानासाठी ‘ऑफर’ देणार्या फोनची वाट पाहत आहेत. लांडे यांची बंडाळी खरी की खोटी, यावरच या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.
विलास लांडे यांचे राजकारण कसे असते, हे पिंपरी-चिंचवडकरांना विशेषत: भोसरीकरांना चांगलेच माहिती आहे. विधान परिषदेतील पुण्याच्या जागेसाठी झालेल्या आणि होत असलेल्या नाट्यमय घडामोडीत लांडे हेच केंद्रस्थानी
आहेत व त्याचे कारण म्हणजे लांडे यांचे न समजून येणारे राजकारण हेच आहे. दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून विलास लांडे यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आमदारकी मिळवण्याचे गणित आखले होते. त्यानुसार त्यांचे नियोजन आणि जुळवाजुळव सुरू होती. नोव्हेंबर 2016 मध्ये ती निर्णायक घडी आली, तेव्हा मात्र हवे तसे पोषक वातावरण त्यांना मिळाले नाही. सर्वप्रथम उमेदवारी हातातून गेली. विद्यमान आमदार अनिल भोसले यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षपातळीवर झाला. कारण काय तर, उमेदवारी मिळाली नसती, तर भोसले राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले असते आणि तेथून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
लांडे यांना डावलण्यात आल्याने त्यांचे आमदारकीचे स्वप्न भंगणार, अशी परिस्थिती स्पष्टपणे दिसत होती. मात्र, शांत बसतील ते लांडे कसले. परंपरेप्रमाणे त्यांनी याही वेळी बंडखोरी केली. तसा अर्ज दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली. लांडे खरोखर लढतील काय, त्यांच्या बंडखोरीमागे नेमके कोण आहे, त्यांना अजित पवार अथवा शरद पवार यांचा पाठिंबा आहे काय, आमदार लक्ष्मण जगताप त्यांना आतून मदत करणार काय, भाजप-शिवसेनेशी त्यांचे ‘सेटलमेंट’ होईल काय, अशा अनेक चर्चांना ऊत आला. प्रत्यक्षात खरे काय आणि खोटे काय, हे लांडे यांनाच माहिती असेल. त्यांच्या मनाचा ठाव भल्याभल्यांना लागत नाही, असे भोसरीकर सांगतात. विधान परिषद निवडणुकीतही तसेच काहीसे घडले आहे.
विलास लांडे म्हणतात की, मला माघार घ्यायची होती. मी प्रतिनिधी पाठवले होते. मात्र, ते वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे तांत्रिक कारणास्तव उमेदवारी कायम राहिली. तरीही मी अनिल भोसले यांचा प्रचार करेन आणि त्यांना निवडून आणेन. अशी भूमिका त्यांनी प्रसारमाध्यमांसमोरही मांडली. मात्र, लांडे यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नाही. कारण, वरकरणी दिसते तितके सरळ आणि सोपे चित्र नाही. लांडे यांचा आतापर्यंतचा प्रवास आणि पवारांच्या खेळींचा अभ्यास असणार्यांना यामागे काय सुरू आहे, याचा सुगावा नक्कीच लागू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने विलास लांडे काय किंवा आझम पानसरे काय, यांना आमदारकी देऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका सुरक्षित करण्याची संधी होती. मात्र, दोघांनाही उमेदवारी न देता भोसले यांना देण्यात आली. त्याचा परिणाम म्हणजे पिंपरी शहर राष्ट्रवादीतील मोठा गट पवारांवर नाराज झाला. जर खरोखरच अनिल भोसले पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत होते आणि ही माहिती पवारांना होती. तरीही ते भोसले यांना उमेदवारी देतील का आणि उमेदवारी दिली तरी ते निवडून यावेत, असे त्यांना वाटत असेल का, असाही प्रश्न उपस्थित केला जातो. या मतदारसंघात निवडून येण्यापुरती राष्ट्रवादीची ताकद नक्कीच आहे. रिंगणात केवळ पाच उमेदवार आहेत.
लांडे यांचे नाव, ते म्हणतात त्याप्रमाणे तांत्रिक कारणास्तव राहिले, असे मानल्यास भोसले निवडून येतील, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. मात्र, लांडे यांचा माघारीचा कांगावा खोटा असल्यास आणि त्यांनी खरोखर निवडणूक लढवली तर लांडे विजयी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पिंपरी-चिचंवड महापालिकेत 128 नगरसेवक आहेत. त्यातील 25 नगरसेवक लांडे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांनी शिरूर लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे या पट्ट्यातील सदस्यांशी त्यांचा थेट परिचय आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतांची खरेदी-विक्री करण्याची वेळ आलीच, तर त्यामध्ये त्यांचा चांगलाच हातखंडा आहे. त्यांची आर्थिक सुबत्ता पाहता ते बाजारभावापेक्षा जास्त भाव मतदाराला देऊ शकतात, इतकी त्यांची ऐपत नक्कीच आहे. अनेक नगरसेवक उमेदवारांचे फोन येण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.
लांडे यांची नेमकी भूमिका काय राहील, यावरच या निवडणुकीचे भवितव्य आहे. ते रिंगणात कायम राहिल्यास अनिल भोसले विरूद्ध विलास लांडे अर्थात अधिकृत विरूद्ध बंडखोर उमेदवार असा थेट सामना होणार आहे. राष्ट्रवादीला बंडखोरी नवीन नाही आणि विलास लांडे यांना तर बिलकूल नाही. पुण्याची जागा पूर्वी काँग्रेसकडे होती. ती राष्ट्रवादीने बंडखोरी करून हिसकावून घेतली. आता ती त्यांना कायम ठेवायची आहे. भोसले काय किंवा लांडे काय, कोणीही निवडून आले तरी राष्ट्रवादीच्या नावावरच विजयश्री नोंदवली जाणार आहे. तूर्त पडद्यामागे नेमके काय सुरू आहे, ते उघड झाल्यानंतरच या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.