धुळे : आदिवासी कोळी जमातीला एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे, अशी मागणी कोळी महासंघाने केली आहे. याबाबत केंद्रीय रस्ता परिवहन व जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी कोळी जमातीवर अन्याय करणारी जात पडताळणी समिती रद्द करण्यात यावी अथवा तिच्या जाचक अटी रद्द करव्यात. राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीत 47 जातीची संख्या असून निवडक जातींनाच लाभ मिळत आहे. जणगणनेच्या वेळेस आदिवासी कोळी जमातीला शेड्युल ट्राईब (एसटी) म्हणून गणना केली जाते. मात्र, लाभाच्या वेळेस या जमातीस वंचित ठेवण्यात येते. तसेच जातीच्या दाखल्यासाठी प्रांताधिकार्यांकडून 1950 पूर्वीची पोट जातीची अट टाकण्यात येते व अर्जदारास वंचित ठेवण्यात येते.
गेल्या विधानसभा निवडणुकीत कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील संपूर्ण कोळी जमात भाजपाच्या पाठीशी उभी राहिली. त्यामुळे सरकारने आपले आश्वासन पूर्ण करावे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष नितीन कोळी, जिल्हा युवाअध्यक्ष गणेश कोळी, उपाध्यक्ष दौलत सोनवणे, किशोर शिरसाठ, डोंगर बोरसे, नारायण वाकडे, रवींद्र कोळी, भैय्यासाहेब कोळी आदींच्या स्वाक्षर्या आहेत.