छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुंबईतील स्मारकामुळे महाराष्ट्र राज्याचीच नव्हे, तर देशाची जगाला नवी ओळख होईल. देशभरातील गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि दुरूस्ती करून किल्ले पर्यटनाला चालना दिली जाईल, याची सुरूवात शिवरायांच्या किल्ल्यांपासून करण्यात येईल. शिवाजी महाराजांनी सुशासनाची परंपरा पुढे नेली असून, त्याच धर्तीवर सामान्य माणसाचा विकास डोळ्यासमोर ठेवून केंद्र व राज्यसरकार प्रयत्नशील आहे. शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व बहुआयामी होते. त्यांच्या अनेक पैलूंचा भारतीयांच्या जीवनावर प्रभाव दिसून येतो. संघर्षातून त्यांनी सुशासनाची उत्तम परंपरा पुढे नेली. ते पराक्रमी होते, त्यांच्याकडे उत्तम संघटनकौशल्य होते. जलव्यवस्थापनाचे त्यांनी घालून दिलेले आदर्श आजही सर्वांना मार्गदर्शक आहेत. जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले, त्यापासून सामान्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी महाराजांचे भव्य स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येत आहे.

– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

शिवस्मारक आणि मेट्रो प्रकल्पाचा प्रारंभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात तेही मुंबई-पुण्यात आले. दोन्हीकडे दणदणीत सभा घेत मोदींनी नागरिकांची मने जिंकली. मोदींच्या या दौऱ्याच्या निमित्ताने आगामी स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुकांची वातावरणनिर्मिती करण्याची संधी भारतीय जनता पक्षाने सोडली नाही. ‘शत प्रतिशत भाजप’ हा नारा, भाजपला प्रत्यक्षात आणायचा आहे, त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे.

मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बहुचर्चित शिवस्मारक आणि पुण्यातील वादाच्या भोवऱ्यात अडकलेली मेट्रो, या दोन्ही प्रकल्पांच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबईत आणि पुण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही शहरातील वातावरण ढवळून निघाले.

मुंबईत शिवसेना विरूद्ध भाजप, तर पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी विरूद्ध भाजप अशी राजकीय वादाची किनार होती. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मोदींचा दौरा आयोजित करण्यात आल्याने त्याकडे राजकीय दृष्टीकोनातूनच पाहिले गेले. मोदी यांच्या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपने जोरदार वातावरणनिर्मिती केली आणि शक्तीप्रदर्शनही केले. राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यापाठोपाठ, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. मोक्याच्या क्षणी मोदींना राज्यात आणण्यामागे भाजपचे तेच नियोजन होते, हे लपून राहू शकले नाही. नगरपालिका निवडणुकांमध्ये राज्यात भाजप अव्वल स्थानावर राहिला आहे. आगामी निवडणुकीतही भाजपच पहिल्या क्रमांकावर राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी व्यक्त केला आहे. तथापि, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास, भाजपकडे ‘मोदी कार्ड’शिवाय पर्याय नाही. प्रचाराला ठोस मुद्दा नाही. राज्यातील नेत्यांमध्ये उमेदवार निवडून आणण्याची क्षमता नाही. मोदी यांच्या नावाचाच आधार त्यांना घ्यावा लागतो.

मुंबईत शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपला शिवसेनेशी युती करण्याची बिलकूल इच्छा नाही. शिवसेनेला मुंबईची सत्ता सोडायची नाही. मात्र, भाजपशी उघड शत्रुत्वही घ्यायचे नाही. त्यामुळे केंद्रात व राज्यात शिवसेना भाजपच्या सरकारमध्ये आहे. मात्र, तरीही दोघांचे वागणे कट्टर प्रतिस्पर्ध्यासारखे आहे. मुंबईत युतीचे काय होते, त्यावर राज्यातील अन्य भागांमध्ये युतीचे भवितव्य ठरणार आहे.

पुण्याच्या राजकारणात भाजप-राष्ट्रवादीत सख्य असल्याचे नेहमीच दिसून येते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर प्रशांत जगताप यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. अजित पवारांशी मैत्री असलेल्या बापट यांचे महापौरांशी मात्र सूत जुळेना, अशी परिस्थिती आहे. शरद पवार यांच्यासमक्ष मोदींनी पुण्याच्या महापौरांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला, यावरून मोदींना स्थानिक पातळीवर होणा घडामोडींची ‘परफेक्ट रिपोर्टिंग’ होत असावी, असे म्हणता येऊ शकते.

‘स्मार्टसिटी’ रोजनेतून पिंपरी-चिंचवडला वगळले, हा मुद्दा मोदींच्या समोर चर्चिला गेला. नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी पिंपरी-चिंचवडवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही दिली. ही पिंपरी-चिंचवडकरांच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे.

पुणे आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणी मोदींनी नोटाबंदीचा विषय आवर्जून मांडला. या निर्णयामुळे झालेल्या परिस्थितीचे वर्णन करतानाच सहकार्य करणाऱ्या नागरिकांविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विरोधकांकडून नोटाबंदीच्या विषयावर होणारे राजकारण लक्षात घेता, मोदींनी मांडलेले ‘नोटापुराण’ सूचक मानले जाते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here