अजित पवार : पिंपळे सौदागर येथील लिनिअर गार्डनचे भूमिपूजन
‘ज्यांना जायाचे तिकडे जा, आम्ही घाबरत नाही’
पक्षाकडून निधी घेऊन कामं करायची व आयत्यावेळी या पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारायची अशी काहींची सवय आहे. मी ज्यांना मोठे केले तेच दिवसा माझ्याकडे तर रात्री दुसऱ्या पक्षात जात आहेत. ज्यांना जिकडे जायाचे तिकडे जाऊ देत, आम्हाला फरक पडत नाही. पक्षाने अनेकांना मोठे केले आहे. मात्र आपण ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्यांना विसरू नये, जर एकाच्या नावाचा कुंकू लावला तर तो शेवट पर्यंत त्यांच्याच नावाने लावायचा असतो. कोणी जाण्याने पक्ष कमी होत नाही, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार रा वेळी म्हणाले.
पिंपरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॅट्रो प्रथम नागपुरला नेली, पालकमंत्री गिरीष बापट यांनीही पीएमआरडीएचे कार्यालय पुण्यात नेले, मीही बारामतीपेक्षा पिंपरी-चिंचवडवर जास्त प्रेम करतो. त्यामुळे सत्ता असो वा नसो पिंपरी-चिंचवडकरांसाठी काम करत रहाण्याचे वचन देतो, असे भावनिक आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
प्रभाग क्रमांक 55 रहाटणी-पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकात साकारल्या जाणाऱ्या 11 कोटी खर्चाच्या लिनिअर गार्डनचे भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या वेळी महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, माजी नगरसेवक राष्ट्रीय खेळाडू शंकर काटे, ’ड’ प्रभाग अध्यक्ष अरुण टाक, नगरसेवक कैलास थोपटे, राष्ट्रवादीचे नेते विट्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका शीतल काटे, अनिता संदीप काटे, केंद्रीय पोलाद मंत्रालय सदस्य संदीप काटे, नीलेश काटे, माजी नगरसेविका सुभद्रा जगताप, राष्ट्रवादी सहकार सेलचे अध्यक्ष सुनील कुंजीर, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष उत्तम धनवटे, महापालिकेचे पदाधिकारी, परिसरातील विविध सोसायटी मधील पदाधिकारी तसेच रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, पिंपरी – चिंचवड शहराचा विकास करणे हेच माझे एकमेव ध्येय होते व आहे त्यामुळे अवघ्या काही वर्षात शहराचा काया पालट केला आहे. त्याच बरोबर उपनगरांचाही झपाट्याने विकास होत आहे. रहाटणी व पिंपळे सौदागर हा परिसर अगदी काही वर्षात विकसित झाला आहे. या परिसराचे नाव राज्याच्या नव्हे तर देशाच्या काना कोपर्यात पोहचले आहे. आणखी यात भर म्हणजे लिनीअर गार्डन सारखा महत्वकांक्षी प्रकल्प राबवित आहे.
अद्यावत अशा या गार्डनमध्ये 2.5 कि. मी.चा जॉगिंग ट्रॅक,सायकल ट्रॅक, वैविध्यपूर्ण संकल्पनांवर आधारित पर्यावरणपूरक पुरक उद्यान, ट्राम पॅसेंजर रेल्वेसाठी आरक्षित जागा,आधुनिक एलईडी प्रकाश व्यवस्था अशी विकास कामे होणार आहेत.