स्मार्ट सिटी मिशनमुळे शहरी रस्ते, सार्वजनिक परिसरांमध्ये परिवर्तन :- कुणाल कुमार
पिंपरी चिंचवडमधील तिस-या राष्ट्रीय कार्यशाळेचा शनिवारी यशस्वी समारोप
स्ट्रीट फॉर पीपल आणि इंडिया सायकल्स फॉर चेंज या उपक्रमात विजेत्या ठरलेल्या १५ शहरांचा गौरव
‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ आणि ‘इंडिया सायकल्स फॉर चेंज’ या स्पर्धांमध्ये पिंपरी-चिंचवडला चौथे स्थान
पिंपरी :- प्रत्येक शहरात कोणत्याही विकासकामाला नेहमीच वाव असतो. प्रत्येक शहराची वेगळी ओळख असते आणि स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या नाविन्यपुर्ण उपक्रमांमुळे, विकासकामांमुळे ती ओळख आणखी वाढली असून नागरिकांचे राहणीमानही सुधारले आहे. काही शहरांमध्ये फक्त मुलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले जात होते, पण स्मार्ट सिटी मिशनमुळे आधुनिकतेला चालना भेटत असल्याचे आणि शहरी रस्ते तसेच सार्वजनिक परिसरांमध्ये परिवर्तन होताना दिसत असल्याचे मत स्मार्ट सिटीचे सहसचिव आणि मिशन डायरेक्टर कुणाल कुमार यांनी व्यक्त केले.
भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत स्मार्ट सिटीज मिशन आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरात आयोजित करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी मिशनच्या तिस-या राष्ट्रीय कार्यशाळेचा शनिवारी यशस्वी समारोप झाला. या दोन दिवसीय कार्यशाळेत शहरांच्या रस्ते आणि सार्वजनिक जागांच्या सुधारणा तसेच नवीन उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. तसेच, स्ट्रीट फॉर पीपल आणि इंडिया सायकल्स फॉर चेंज या उपक्रमात विजेत्या ठरलेल्या पिंपरी चिंचवड, अजमेर, भोपाळ, चंदीगढ, इंदौर, जबलपूर, झांसी, कोची, कोहिमा, नागपूर, न्यू टाऊन कोलकाता, राउरकेला, सिल्वासा, सूरत, उज्जैन या शहरांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यासोबत कार्यशाळेत फ्रीडम टू वॉक सायकल रनमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही गौरव करण्यात आला.
या कार्यशाळेस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व्यवस्थापकीय संचालक राहुल महिवाल, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, स्वतंत्र संचालक प्रदीप भार्गव, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, ज्ञानदेव जुंधारे, मनोज सेटीया, उप आयुक्त संदीप खोत, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, लक्ष्मीकांत कोल्हे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे उप आयुक्त बापू बांगर, उप अभियंता सुनिल पवार, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, सल्लागार विकास ठाकर, प्रांजली देशपांडे, प्रसन्न देसाई, आयटीडीपीचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप अवस्थी, उपव्यवस्थापक ए.व्ही. वेणुगोपाल, प्रांजल कुलकर्णी तसेच ४३ शहरांमधील स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांसह उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
स्मार्ट सिटीचे सहसचिव आणि मिशन डायरेक्टर कुणाल कुमार यांनी शहराच्या सामाजिक आणि आर्थिक भविष्याला आकार देण्यासाठी रस्त्यांची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले. त्यांनी रस्त्यांचे स्वरूप आणि वापर यांवर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला. तसेच नाविन्यपूर्ण उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अनुभवी तज्ञांची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी महत्त्वाकांक्षी ‘हरित सेतू’ या प्रकल्पाबद्दल संगणकीय सादरीकरकणाद्वारे सविस्तर माहिती दिली. तसेच हा प्रकल्प एकात्मिक आणि आधुनिक दृष्टीकोन असून यामध्ये रस्त्यांची रचना, उपक्रम, पादचाऱ्यांची सुरक्षितता, पार्किंगची सोय, अशा विविध बाबींचा विचार करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच या प्रकल्पामुळे पुढील ९ वर्षांमधील परिवर्तनाची वचनबद्धता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. रस्ते हे शहरांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाचे आहेत. रस्त्यांच्या डिझाईनमध्ये नागरिकांच्या गरजा लक्षात घेणे गरजेचे असून तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते सुधारणण्यासाठी नवीन उपाययोजना कराव्यात. सतत सहभागी नियोजनामुळे रस्ते आणि सार्वजनिक जागा सुधारणण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे कार्यकरी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत शहरात करण्यात आलेले बदल, नवनवीन उपक्रम व भविष्यातील आव्हानांविषयी माहिती दिली. तसेच पिंपरी चिंचवड हे ब्लूमबर्ग इनिशिएटीव्ह ग्रांट मिळवलेले भारतातील एकमेव शहर असल्याचेही त्यांनी सांगितले.
आयटीडीपीचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप अवस्थी यांनी पिंपरी चिंचवडचे शाश्वत वाहतुकीचे राष्ट्रीय उदाहरण असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी शहराच्या ऍक्शन-फाऊंडेशन-कम्युनिकेशन फ्रेमवर्कचेही त्यांनी कौतुक केले. तर उपव्यवस्थापक प्रांजल कुलकर्णी यांनी भविष्यातील पायाभूत सुविधांची रचना सुधारण्यासाठी रस्त्यांवरील परिणामांचे मूल्यांकन करण्याच्या महत्त्वावर भर दिला.
शहरी रस्ते आणि सार्वजनिक परिसर नागरिकांना केंद्रबिंदू मानून विकसित करण्यासाठी देशातील विविध शहरांमध्ये ‘शहरी रस्ते व सार्वजनिक परिसर विकास’ या राष्ट्रीय कार्यशाळांच्या मालिकेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळांचा उद्देश प्रत्यक्ष सादरीकरणाद्वारे तसेच चर्चेद्वारे रस्ते बांधणीच्या आधुनिक उपाययोजनांवर चर्चा करणे, रस्ते बांधणीच्या टिकाऊपणावर लक्ष केंद्रित करणे आणि रहदारी टाळण्यासाठी विविध उपाययोजना करणे हा आहे. याआधी श्रीनगर आणि कोयंबतुर या शहरांमध्ये या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांचे आभार सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे यांनी मानले.
पिंपरी-चिंचवड शहराने ‘फ्रीडम टू वॉक सायकल रन’ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावली.
- तिमाही १: सायकल आणि धावण्याच्या श्रेणीत प्लॅटिनम पुरस्कार, तिमाही २: सायकल आणि चालण्याच्या श्रेणीत प्लॅटिनम पुरस्कार आणि धावण्याच्या श्रेणीत सुवर्ण पदक, याशिवाय, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही व्यक्तिगत स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावली.
- अमित दीक्षित, ज्युनियर इंजिनियर, पीसीएमसी: सायकल श्रेणीत तिमाही १ आणि २ मध्ये प्लॅटिनम पुरस्कार, अनंत चुटके, संगणक ऑपरेटर, पीसीएमसी: तिमाही २ मध्ये सायकल श्रेणीत सुवर्ण पदक, मेजर उदय जरांडे, मुख्य सुरक्षा अधिकारी, तिमाही २ मध्ये चालण्याच्या श्रेणीत सुवर्ण पदक पटकाविले. प्रसाद देशमुख, ज्युनिअर इंजिनिअर यांनी चालणे या श्रेणीत सुवर्ण पदक मिळविले.
शहराच्या या यशामध्ये सर्वसामान्य नागरिकांसोबतच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचाही मोठा वाटा आहे. या स्पर्धेमुळे शहरात चालणे, सायकलिंग आणि धावण्याला चालना मिळाली आहे, तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही ही स्पर्धा फायदेशीर ठरली आहे. ‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ आणि ‘इंडिया सायकल्स फॉर चेंज’ या स्पर्धांमध्ये पिंपरी-चिंचवडला चौथे स्थान मिळाले. हे यशही शहरासाठी अभिमानास्पद आहे. या सर्व स्पर्धांमुळे शहरात पायाभूत सुविधा सुधारण्यावर आणि नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैली जगण्यासाठी प्रोत्साहित करण्यावर अधिक भर दिला जाईल.
- शेखर सिंह, आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी