साक्री:- येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठया आनंदात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील, शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे, कार्यक्रमाचे संयोजक श्रावण अहिरे, रवींद्र सोनवणे, जागृती जाधव यांच्या हस्ते सरस्वती माता व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी इयत्ता आठवीतील पूर्वी राणे व इयत्ता नववी हर्षवर्धन पाटील या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आरोही देसले (चौथी), हार्दिक माळीजकर (सातवी), विराज भामरे (पाचवी), मंजिरी ससले (पाचवी), मृणाल बेडसे (नववी ), या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला. शाळेच्या शिक्षिका सपना देवरे यांनी महाराजांचे कार्य विषद केले. ‘परावर्तन’ हे महाराजांच्या स्वराज्याचे आणखी एक वैशिष्ट्य. एखादा हिंदू परधर्मात गेला. तर त्याची परतीची दारे कायमची बंद होत असत. परंतु शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश दिला आणि ही वाईट प्रथा बंद करून नवीन रीत सुरू केली. शिवरायांनी कालानुरूप बदलाचे धोरण स्वीकारले आणि स्वराज्यात आधुनिक युग अवतरले. आपण मुघलांचे मांडलिक समजले जाऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी तीन प्रमुख गोष्टी केल्या. महाराजांनी स्वतःच्या मस्तकावर छत्र धारण करून स्वतःला छत्रपती म्हणविले. स्वतःच्या नावाने सोन्याची नाणी पाडली. राज्याभिषेक झाल्याच्या दिवसापासून’ राज्याभिषेक’ शक ही कालगणना सुरू केली. शिवाजी महाराजांनी मंदिरे बांधली. तिरूवन्न मलई (तामिळनाडू) व श्री सप्तकोटेश्वर (गोवा) या ठिकाणांची मंदिरे आजही साक्ष देत असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे यांनी मनोगत व्यक्त करताना, स्वदेशी आणि स्व:भाषा याबाबत शिवाजी महाराज अतिशय जागरूक होते. त्याकाळी मराठी भाषेत फारसी शब्दांची घुसखोरी झाली होती. त्यांनी फारशी शब्द हद्दपार करून त्यांना पर्यायी शब्द देणारा “राज व्यवहार कोश “तयार केला. महाराजांची राजमुद्रा ही संस्कृत भाषेत होती. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे बलाढ्य आरमार उभे करून पोर्तुगीज, इंग्रज आणि परकीय राजवटींना पायबंध घातला, असे सांगितले.
भार्गवी ठाकरे (सातवी) या विद्यार्थिनीने शिवगर्जेनेचे सादरीकरण केले. याप्रसंगी सुमित तोरवणे (एलकेजी), ऋषभ बोरसे (दुसरी), तन्मय जाधव (सहावी), प्रतीक जैन (सहावी), जय काकुस्ते (पाचवी), सोहम बोरसे (पाचवी) या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली.
पहेल नांद्रे (सहावी), गार्गी सोनवणे (सहावी), पृथ्वी अहिराव (एलकेजी), दिशा राणे (दुसरी), आराध्या शिरसाठ (सहावी) यांनी जिजाऊ मातेची भूमिका साकारली. चिन्मय देशपांडे (एलकेजी) सईबाई, वैदही दैते (एलकेजी) या विद्यार्थिनींनी सोयराबाई यांची भूमिका साकारली.
याप्रसंगी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी “झुलवा पाळणा” या गीतावर नृत्य सादरीकरण केले. त्यास गीतांजली काकुस्ते यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी सुंदर फलक लेखन व सजावट करण्यात आली होती. यासाठी भूपेंद्र साळुंखे, वैष्णवी थोरात, दीपमाला मॅम, वैष्णवी देवरे मॅम यांनी पुढाकार घेतला. सुंदर रांगोळीचे रेखाटन सविता लाडे, वैष्णवी थोरात, दीपमाला मॅम यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन श्रावण अहिरे, राजेंद्र सोनवणे, जागृती जाधव यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग, इतर कर्मचारी व वाहन चालक वर्ग उपस्थित होते.