प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री येथे रक्षाबंधन उत्सव – सामाजिक जाणीवा जागवणारा आणि सौंदर्यपूर्ण उपक्रम


साक्री – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, साक्री येथे दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधन उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. बंधुत्व, प्रेम, स्नेह आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांना उजाळा देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शाळेचे संस्थापक श्री प्रशांत भीमराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉल द्वारे शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्या सौ. वैशाली लाडे, समन्वयक श्री. वैभव सोनवणे सर आणि श्री. तुषार देवरे सर यांचे मार्गदर्शन लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन इनचार्ज शिक्षकसौ. हेमांगी बोरसे, सौ. सुनीतापाटील व श्री. प्रफुल साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. रोहिणी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनींनी अतिशय प्रभावीपणे पार पाडले. एक आगळावेगळा उपक्रम म्हणून ज्या विद्यार्थ्यांना भाऊ किंवा बहीण नाही अशा विद्यार्थ्यांची जोडी वर्गशिक्षकांनी तयार करून रक्षाबंधन समारंभ साजरा केला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये भावनिक एकात्मता आणि बंधुत्वाची भावना वृद्धिंगत झाली. याच दिवशी विद्यार्थिनींनी सीमेवरील सैनिकांसाठी प्रेमाने राख्या तयार करून त्यांना पाठवल्या. दुसरीकडे विद्यार्थिनींच्या पथकाने शिक्षक सौ. स्मिता नेरकर व सौ. गीतांजली काकुस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट, तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन आणि सफाई कामगार यांना राखी बांधण्याचा सामाजिक उपक्रम राबवला. तसेच सौ. नितू पंजाबी सौ. कांचन मॅडम व श्री. तुषार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेतील कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांनी राखी बांधण्याचा उपक्रम राबविण्यात आला.



आपल्या समाजासाठी नेहमी कार्यरत राहणारे हे सर्व आपले मदतनीस कोणताही सण वार किंवा स्वतःची वैयक्तिक कुटुंबाची काळजी न करता आपल्या समाजाच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतात. सीमेवरील जवान आपला स्वतःचा जीव नेहमी धोक्यात ठेवून आपल्या देशाची अविरत सेवा करत असतात. या सर्व गोष्टींची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याचा उपक्रम राबवणारी साक्री तालुक्यातील ही पहिलीच शाळा आहे. या प्रसंगी श्री. राजरत्न सर यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगणारे प्रभावी भाषण केले.
विद्यार्थिनींनी सादर केलेले रक्षाबंधनावर आधारित नृत्य आणि गीते कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. कार्यक्रमस्थळी भव्य सजावट करण्यात आली होती. दीपमाला अहिरराव, पूजा जोहरी जितेंद्र कासार, पियुष बागुल व भूपेंद्र साळुंखे यांनी मेहनत घेऊन सुंदर सजावटीने संपूर्ण परिसर साजरा केला. हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. बंधुत्व, प्रेम आणि सामाजिक जबाबदारीची खरी शिकवण विद्यार्थ्यांच्या मनामनात खोलवर रुतली.




















