नवी दिल्ली :- युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) हा अलिकडच्या वर्षांत सर्वाधिक वापरला जाणारा डिजिटल पेमेंट मोड म्हणून उदयास आला आहे. UPI Lite हे भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सप्टेंबर 2022 मध्ये अल्प प्रमाणात UPI पेमेंट्स सुलभ करण्यासाठी सादर केले होते. आता पेटीएमनेही हे फीचर आपल्या यूजर्ससाठी आणले आहे. या फीचरची खास गोष्ट म्हणजे 200 रुपयांपर्यंतच्या UPI पेमेंटसाठी तुम्हाला 4 किंवा 6 अंकी UPI पिन टाकण्याची गरज नाही. पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडने लहान मूल्याच्या UPI व्यवहारांसाठी UPI Lite लाँच केले आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, या फीचरच्या माध्यमातून यूजर्स एका क्लिकवर रिअल टाईम व्यवहार जलद करू शकतील. पेटीएम पेमेंट्स ही UPI लाइट फीचर लाँच करणारी पहिली पेमेंट बँक आहे.
पासबुकमध्ये नोंद नाही…
या फीचरची खास गोष्ट म्हणजे आता बँकेचे पासबुक रोजच्या छोट्या व्यवहारांनी भरले जाणार नाही. हे व्यवहार आता फक्त पेटीएम बॅलन्स आणि हिस्ट्री विभागातच दिसतील. 200 रुपयांपर्यंतच्या पेमेंटसाठी पिन टाकण्याची गरज नाही, पेटीएम पेमेंट्स बँकेनुसार UPI लाइट वॉलेट वापरकर्ते एकदा लोड केल्यानंतर पिन न टाकता व्यवहार करू शकतात. यामुळे पेमेंट प्रक्रिया सुलभ आणि जलद होईल. UPI Lite मध्ये दिवसातून 2 वेळा कमाल 2000 रुपये जमा करता येतात. या फीचरचा वापर करून तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त 4000 रुपये पेमेंट करू शकता. सध्या हे वैशिष्ट्य सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही.
पेटीएममध्ये UPI लाइट कसे सक्रिय करावे…
- सर्वप्रथम पेटीएम अॅप अपडेट करा.
- आता पेटीएम अॅप उघडा
- त्यानंतर पेटीएम होम पेजच्या वरच्या डाव्या बाजूला प्रोफाइलवर टॅप करा
- आता UPI आणि पेमेंट सेटिंग्जवर क्लिक करा आणि दुसऱ्या सेटिंगमध्ये UPI Lite वर टॅप करा
- नंतर UPI Lite साठी बँक खाते निवडा
- UPI Lite सक्रिय करण्यासाठी पैसे जोडा
- पेजवर UPI Lite मध्ये जोडण्यासाठी रक्कम एंटर करा.
- UPI पिन एंटर करा आणि त्याची पडताळणी करा. अशा प्रकारे UPI Lite खाते तयार होईल.
- UPI Lite खाते तयार केल्यानंतर, तुम्ही तुमचा पिन न टाकता पुढील UPI पेमेंट करू शकता.