कार्यालय-घरातून मिळाली तब्बल 8 कोटींची रोकड
नवी दिल्ली : कर्नाटकात लोकायुक्तांनी भाजप आमदार मदल वीरूपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत कुमार याला 40 लाख रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी अटक केली. प्रशांतला त्याच्या वडिलांच्या ‘कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेड’ (KSDL) येथील बंगळुरू येथील कार्यालयातून अटक करण्यात आली. भाजप आमदाराच्या मुलाला अशाप्रकारे लाचप्रकरणात अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
लोकायुक्तांनी केएसडीएल कार्यालय आणि प्रशांत कुमारच्या घरावर छापा टाकला. तेव्हा 8 कोटींची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणानंतर भाजप आमदार मदल वीरूपक्षप्पा यांनी केएसडीएलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, मुलाने ज्या टेंडरमध्ये लाच घेतली, त्यात माझा सहभाग नसल्याचे त्यांनी सांगितले.
लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत हे कर्नाटक प्रशासकीय सेवेतील 2008 च्या बॅचचे अधिकारी आहेत. साबण आणि इतर डिटर्जंट बनवण्यासाठी कच्चा माल खरेदी करण्यासाठी त्यांनी कंत्राटदाराकडे 80 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर ठेकेदाराने लोकायुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीवरून लोकायुक्तांनी प्रशांतला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला. ही रक्कम केएसडीएलचे अध्यक्ष मदल वीरुपक्षप्पा यांच्यामार्फत घेण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अशा परिस्थितीत लाच घेतल्याच्या या प्रकरणात पिता-पुत्र दोघेही आरोपी आहेत, असे लोकायुक्तांनी सांगितले.
या प्रकरणाची माहिती मला प्रसारमाध्यमांद्वारे मिळाली आहे. माझा मुलगा आता लोकायुक्तांच्या ताब्यात असल्याने मी याबाबत त्याच्याशी बोललो नाही. मी कोणत्याही प्रकरणात सहभागी नाही, असे आमदार मदल वीरूपक्षप्पा यांनी सांगितले.