मुंबई : शिवाजी पार्क येथे आज सकाळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. देशपांडे हे सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला आले असता, त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा मनसेच्याच पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील उल्हानगरमधील पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संदीप देशपांडे यांना मारहाण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. या मारहाणीचे वृत्त समोर आल्यानंतर विविध राजकीय नेतेमंडळींनी या घटनेचा निषेध केला. त्यानंतर आता उल्हानगरमधील मनसे विभाग अध्यक्ष योगीराज देशमुख यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. देशमुख यांना तीन ते चार जणांनी मारहाण केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय भूखंडावर अतिक्रमण होत असल्याचा योगीराज देशमुख पाठपुरावा करत होते. त्याच प्रकरणातून त्यांना मारहाण झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
संदीप देशपांडे हे सकाळी शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला जात होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. यादरम्यान हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते. त्यामुळे हल्लेखोरांची ओळख अद्याप पटली नाही. या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून तातडीने पलायन केले. या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले. देशपांडे यांच्यावर रॉड व स्टम्पने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संदीप देशपांडेंच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे.
संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळीच हल्ला झाला. त्यानंतर आता ठाणे जिल्ह्यातील उल्हानगरमधील पदाधिकारी असलेल्या योगीराज देशमुख यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.