पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीपूर्वी शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत केंद्र व राज्य या दोन्ही सरकारने केलेली कामे पोहोचवण्यासाठी शहर भाजपने कंबर कसली आहे. त्यानुसार शहरात घर चलो अभियान राबविण्यात येणार असून, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील तीनही मंडलांतर्गत येणाऱ्या ५२८ बुथ कार्यकर्त्यांचे गुरूवारी रहाटणीत संमेलन घेण्यात आले. त्यामध्ये या अभियानाबाबत प्रशिक्षण देऊन बुथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. देशात सेवा, सुशासन आणि गरीबांचे कल्याण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने राबवलेल्या योजना, त्या योजनांचा प्रत्यक्षात जनतेला झालेला लाभ नागरिकांपर्यंत धुमधडाक्यात पोहोचवण्याचे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी या संमेलनात केले.
रहाटणी येथील विमल गार्डन बँक्वेट हॉल येथे हे संमेलन दोन सत्रामध्ये पार पडले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, घर चलो अभियानाचे संयोजक विलास मडिगेरी, चिंचवड विधानसभा संयोजक सिद्धेश्वर बारणे, सरचिटणीस नामदेव ढाके, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सांगवी-रहाटणी मंडल अध्यक्ष संदिप नखाते, वाकड-थेरगाव मंडल अध्यक्ष प्रसाद कस्पटे, रावेत-काळेवाडी सोमनाथ भोंडवे, विधानसभा प्रमुख काळूराम बारणे यांच्यासह ५२८ बुथ कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात देशाच्या सर्वच क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला आहे. गरीब कल्याण, महिला सशक्तीकरण, देशांतर्गत व बाह्य सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगिरी करून आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाचे नाव उंचावले आहे. त्याचप्रमाणे देशातील भाजपशासित राज्यांनीही आपापल्या राज्यात मोठा विकास केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना केंद्र व राज्य सरकारांची हीच विकासाची गाथा तळागाळापर्यंत सांगण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे. त्यातून लोकसभा निवडणुकीत जनतेचा विश्वास जिंकण्याचा भाजपचा इरादा आहे. त्यासाठी भाजपने ग्रामीण भागात गाव चलो अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ४ ते ११ फेब्रुवारी या काळात हे अभियान राबविण्यात येत आहे.
त्यानुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघातील तीन मंडलांतर्गत येणाऱ्या ५२८ बुथ कार्यकर्त्यांचे संमेलन घेऊन घर चलो अभियानाच्या उद्दिष्टांची माहिती देण्यात आली. त्यामध्ये बुथ कार्यकर्त्यांना हे अभियान कसे राबवायचे, कोणते काम करायचे, नागरिकांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती कशी द्यायची याचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन सत्रात झालेल्या या संमेलनात घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यास सांगण्यात आले. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या नागरिकांच्या घरी भेट घेण्यास सांगण्यात आले. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्याबाबतही बुथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. चिंचवड विधानसभा मतदारसंघात येत्या रविवारपासून प्रत्येक बुथ कार्यकर्त्याने धुमधडाक्यात हे अभियान राबवावे, असे आवाहन शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी यावेळी केले.
या संमेलनात भाजपचे सुपर वॉरियर्स उमेश गायकवाड यांची टाटा मोटर्स एम्प्लॉईस युनियनपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. संमेलनाचे प्रास्ताविक विलास मडिगेरी यांनी केले. आभार संदीप नखाते यांनी मानले.