साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये श्री गणेश जयंती निमित्त पूजा पठण या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येतो. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवसाला तीलकुंड चतुर्थी असेही म्हटले जाते. माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीला पण तेवढेच महत्त्व असून या गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी असेही म्हटले जाते, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली.
गणेश जयंतीचे औचित्य साधून मालपुर येथील पुरोहित यांच्या मंत्रोच्चाराने जॅकी सदाणा, नीतू सदाणा यांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करण्यात आले. तसेच, श्री गणेशास तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखविण्यात आला. तसेच शाळेचे संस्थापक प्रशांत भीमराव पाटील, वाहन चालक वर्ग यांच्यातर्फे नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महाप्रसाद व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थ्यांनी महाप्रसाद व भोजनाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे, विद्यार्थी वर्ग, शिक्षक वर्ग व इतर कर्मचारी वर्ग, वाहन चालक वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन वैशाली पाटील, जयेश बागले, आकांक्षा तेली यांनी केले. या कार्यक्रमासाठी सुंदर डेकोरेशन भूपेंद्र साळुंखे व वैष्णवी थोरात यांनी केले. सुंदर रांगोळीचे रेखाटन सविता लाडे, दीपमाला मॅम, जागृती मॅम यांनी केले. या कार्यक्रमासाठी शिक्षक वर्ग, इतर कर्मचारी वर्ग व वाहन चालक वर्गाचे सहकार्य लाभले.