चौफेर न्यूज – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने घोषित केलेल्या 30 एप्रिलपर्यंतच्या कडक लॉकडाउनमुळे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल झाला आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार 3 मे पासून सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा या आता 6 मेपासून सुरू होतील, अशी माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

गेल्या वर्षी कोरोना आणि लॉकडाउनमुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने झाल्या. कोरोना संसर्गाची भीती कायम असल्याने यंदादेखील ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहेत. विद्यापीठ परीक्षा विभागाकडून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे. आता 6 मेपासून बीए, बीकॉम, बीएस्सी भाग एक आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा सुरू होणार आहेत.

दरम्यान ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी तीन मिनिटांची एक व्हिडिओ क्‍लिप तयार करण्यात आली आहे. ही क्‍लिप सर्व विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षा विभागाकडून पोचवली जाणार आहे. याचबरोबर हेल्पलाइन क्रमांक देखील दिले जाणार आहेत.

तसेचं विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, अशा सोप्या पद्धतीने ऑनलाइन परीक्षा देता येईल, अशी सोय विद्यापीठ परीक्षा विभागाकडून केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाइल, लॅपटॉप, संगणकावरून ऑनलाइन परीक्षा देता येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. विकास कदम यांनी दिली. प्र. कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांच्यासह विद्यापीठातील इतर अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी यांचे ऑनलाइन परीक्षेसाठी सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here