पिंपरी:- महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात अटल महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. २४ आणि २५ डिसेंबर असे दोन दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत हे विनामूल्य अटल महाआरोग्य शिबीर होणार आहे. या शिबीरासाठी ऑनलाइन नाव नोंदणीला सुरूवात झाली असून, गरजू रुग्णांना क्यूआर कोड, वेबसाइट तसेच मोबाईलवर फोन करूनही आपली नाव नोंदणी करता येणार आहे.
या शिबीरात सर्व आजारांच्या तपासण्या, मार्गदर्शन, उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. शिबीरात मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नामांकित रुग्णालये सहभागी होणार आहेत. तसेच तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची मोफत तपासणी करणार असून, शस्त्रक्रियाही मोफत केली जाणार आहे.
ऑनलाइन नाव नोंदणी करा..
शिबीरासाठी रुग्णांना https://healthcamp.site या वेबसाईटवर ऑनलाइन नाव नोंदणी करता येईल. याशिवाय नाव नोंदणीसाठी 7507411111 किंवा 7575981111 या मोबाईल क्रमांकावरही संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. हे शिबीर केवळ तपासणी करण्याकरीताचे शिबीर नसून रुग्णाला बरा होईपर्यंत उपचार करण्यात येणार असल्याचे शिबीराचे आयोजक तसेच भाजपचे चिंचवडे विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी सांगितले. या शिबीराचा जास्तीत जास्त रुग्णांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.