पुणे : पुण्यात धुळवडीला (Dhulivandan) गालबोट लागले असून, जुन्या वादातून मार्केटयार्ड परिसरात डॉ. आंबेडकरनगर येथे भरदुपारी एका तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत तरुणाच्या हाताला गोळी लागली असून, तो जखमी झाला आहे. दरम्यान, अचानक झालेल्या या गोळीबाराने (Firing on Youth) परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्रशांत श्रीकांत गवळी (रा. मार्केटयार्ड) असे गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात संतोष वामन कांबळे (वय 30) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष याच्या बोटाला गोळी लागली असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मार्केटयार्ड भागातील डॉ. आंबेडकरनगर परिसरात दुपारी दोनच्या सुमारास प्रशांत हे त्यांचा भाऊ अजय गवळी याला जेवण करण्यासाठी बोलवत होते. ते एका टपरीजवळ थांबले असताच संतोष त्याठिकाणी आला. त्याने दोन मिनिटं याठिकाणी थांब आलोच म्हणून थांबवून घेतले. त्यानंतर तो काही मिनिटात परत आला आणि त्याने थेट गावठी पिस्तूलातून गोळी झाडली. या गोळीबारात प्रशांत यांच्या हाताच्या बोटाला गोळी लागली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मार्केटयार्ड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आरोपी तेथून पसार झाला होता. दरम्यान हा गोळीबार नेमका का झाला हे समजू शकलेले नाही. संतोष व प्रशांत यांची ओळख आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.