प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये हिंदी दिवसानिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन
साक्री : भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंदी ही अधिकृत संवादाची भाषा आहे. केंद्र सरकार आणि भारतीय संसदेत देखील वापरली जाते. हिंदी ही भारतातील व्यावसायिक संवादासाठी आवश्यक भाषा असून बर्याच व्यवसायांना त्यांच्या कर्मचार्यांना हिंदीत निपुण असणे आवश्यक असते. विशेषतः देशाच्या उत्तर भागात हिंदी भाषेचा अधिक वापर केला जात असून राष्ट्रभाषा हिंदी ही प्रत्येकाल अवगत असली पाहिजे, असे मत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षकांनी व्यक्त केले.
१४ सप्टेंबर हा दिवस देशभरात हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री येथे हिंदी दिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १४ सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंत हिंदी सुंदर स्वाक्षरी लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली लाडे, तुषार देवरे, वैभव सोनवणे, संयोजक रोहिणी सोनवणे यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच, आरुष देसले (एलकेजी), लोकेश भामरे (इयत्ता पहिली), रजत बोरसे (यूकेजी), रिद्धी देसले (यूकेजी), मनीषा जैन (इयत्ता पहिली) यांनी पाठ्यपुस्तकातील हिंदी कविता सादर केल्या.
यावेळी इयत्ता ७ वीतील अश्विनी पाटील, हार्दिक माळीशकार, कृतिका नेरे (६ वी), संजय भामरे (७ वी), प्रतीक भामरे (७ वी), गार्गी सोनवणे, गीतेश राजपूत यांनी हिंदी दिवसाचा उदय याबाबत माहिती दिली. भारतात १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिन साजरा केला जातो. अधिकृतपणे पहिला राष्ट्रीय हिंदी दिवस १४ सप्टेंबर १९५३ रोजी साजरा करण्यात आला. दरवर्षी भारताचे राष्ट्रपतींच्या हस्ते भाषेतील योगदानाबद्दल राजभाषा पुरस्कार दिला जातो. आपल्या देशाच्या एकात्मतेत हिंदी भाषेचे महत्त्वाचे योगदान आहे. समाजातील लोकांशी बोलण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी भाषा हवी. आपल्या सर्वांच्या जीवनात भाषेला खूप महत्त्व आहे. भारतात हिंदीला उच्च स्थान देण्यात आले आहे. जगातील अनेक देशांमध्ये हिंदीचा प्रचार केला जात आहे. जगात हिंदीचा प्रचार व्हावा, यासाठी अशा कल्पना मांडण्याच्या उद्देशाने हिंदी दिन साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली. अविज्ञा पवार आणि देवश्री गांगुर्डे यांनी परीक्षा जवळ आल्यावर कशा समस्या निर्माण होतात, यावर आधारित संवाद सादर केला. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी हिंदीचे महत्त्व सांगणारी कविता सादर केली. वैशाली खैरनार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नीतू पंजाबी यांनी कबीर यांच्या दोह्यांची माहिती सादर केली. शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली लाडे यांनी हिंदी दिनाचे महत्व विषद केले. या कार्यक्रमासाठी सुंदर फलक लावण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी सोनवणे यांनी केले.