धुळे येथे रथोत्सव मिरवणुकीत महिलांचा सहभाग
धुळे : भगवान बालाजींच्या रथोत्सव मिरवणुकीचा समारोप झाला. बालाजींची मूर्ती मंदिरात ठेवल्यानंतर अभिषेकसह विविध कार्यक्रम झाले. त्यानिमित्त दर्शनासाठी महिला-पुरुष भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. महिला या वेळी या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
शहरातील 136 वर्षांची परंपरा असलेल्या भगवान बालाजींचा रथोत्सव शांततेत पार पडला. शहरातील ग. नं. चारमधील बालाजी मंदिरापासून या मिरवणुकीला सुरुवात झाली होती. ही रथ मिरवणूक चौथी गल्ली, राजकमल चित्रमंदिर, सराफ बाजार, आग्रा रोडने थेट महात्मागांधी पुतळा, नगरपट्टी, सहावी गल्ली, मुंदडा चौक, श्रीराम मेडीकल या मार्गे काढण्यात आली. 24 तास चाललेल्या मिरवणुकीमुळे शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
मिरवणुकीत बालाजींच्या दर्शनासाठी शहर व परिसरातील असंख्य भाविकांनी हजेरी लावली. यात महिलांचाही सहभाग मोठा होता. यामुळे शहराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. सकाळी साडेअकरा वाजता रथ पुन्हा बालाजी मंदिराजवळ आला. त्यानंतर, बालाजीच्या मूर्तीसोबत लक्ष्मी आणि पद्मावती यांची मूर्ती मंदिरात ठेवण्यात आली. मूर्तीवर विधीवत अभिषेक करण्यात आला. यावेळी बालाजींच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती. दिवसभरात हजारो भाविकांनी मंदिरात हजेरी लावली.
रथोत्सवांच्या दुसर्या दिवशी भगवान बालाजींचे पाय दाबून सेवा वजा पूजा करण्याची प्रथा जुनीच आहे. त्यामुळे काल भाविकांनी आवर्जून हजेरी लावत मोठया श्रध्देने ही सेवा बजावित पुण्य
मिळवण्याचा प्रयत्न केला.
भगवान बालाजींचे पाद्य पूजन
