पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहुचर्चित निवडणुकांचे खरे चित्र स्पष्ट व्हायला आणि त्याचवेळी
दिवाळीसारखा मोठा सण यायला, एकच टायमिंग साधले आहे. निवडणूक आणि दिवाळी हा योगायोग मतदार राजाच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे, असे मानायला हरकत नाही. तसे पाहता, भारतीय संस्कृतीत वर्षाच्या सुरूवातीपासून अखेरीपर्यंत बाराही महिने सणांची मांदियाळीच असते.
दिवाळी हा यापैकी सर्वात मोठा सण. यंदाची दिवाळी बुधवार, दि. 26 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. सोमवारी, दि. 31 रोजी पाडवा आणि एक नोव्हेंबरला भाऊबीज आहे. अशी ही सात दिवसांची दिवाळी मतदार राजाला खुष करण्यासाठी महत्त्वाचा काळ आहे, असे मानून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले बहुतांश उमेदवार कामाला लागले आहेत.
‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’, असे म्हणत नागरिकांमध्ये या कालावधीत अतिशय उत्सवी
वातावरण असते. राजकीय किंवा इतर गोष्टीत, घडामोडीत त्यांना फारसा रस नसतो, असे वेळोवेळी दिसून आले आहे. दिवाळीत चांगले चित्रपट पाहणे, चांगले नाटक एन्जॉय करणे, एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावणे, सोने-चांदी, कपडे खरेदी करणे, नवे वाहन दारी आणणे, नव्या उद्योग-व्यवसायांना सुरूवात करणे, नातेवाईक, आप्तेष्टांमध्ये रमणे, गोडधोड पदार्थ करून खाणे; तसेच खाऊ घालणे, देवाधर्माचे पाहणे, अशी विविध कामे या कालावधीत केली जातात. राजकीय पक्षांचे, राजकारण्यांचे उरूस कायमच सुरू असतात. तो सगळा तमाशा सणासुदीच्या कालावधीत नागरिकांना नको
असतो; मात्र असे असले, तरी मतदार राजाशी संपर्क साधून त्याला आपलेसे करण्यासाठी हाच योग्य काळ असल्याची भावना ठेवून इच्छुकांकडून मतदारांशी संपर्क साधला जात आहे. त्यासाठी विविध क्लृप्त्या वापरल्या जात आहेत.
पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या निवडणुका यंदा चारसदस्यीय प्रभागपध्दतीने होणार आहेत. शहरात 32 प्रभाग असणार आहेत.
यापूर्वी दोनसदस्यीय प्रभाग होते. त्या तुलनेत नियोजित प्रभागाचे क्षेत्र दुपटीने मोठे असणार आहे. त्यामुळे नव्याने समाविष्ट होणारा भाग मोठा आहे. कदाचित, हा असा भाग असू शकेल, जिथे येण्या-जाण्याचा कधी संबंधच आला नसेल. त्यामुळेच चांगल्या-चांगल्या म्हणविणार्या नेत्याचे, नगरसेवकाचे किंवा कार्यकर्त्याचे धाबे दणाणले आहे. पक्षीय पातळीवर उमेदवारी मिळवणे हे दिव्य आहेत. ते पार पाडत असतानाच पॅनेलमधील अन्य तीन उमेदवारांची अचूक निवड करणे, हेही तितकेच अवघड आहे. याशिवाय, प्रभागातील सर्व भागांचा समतोल साधणे, नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील मतदारांपर्यंत पोहोचणे, त्यांच्यावर प्रभाव पाडणे, तो आपल्याला मतदान करेल, इथपर्यंत त्याची मनधरणी
करणे,
असा हा कालबद्ध
कार्यक्रम इच्छुकांपुढे आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे ‘फिक्सींग’ झाले की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे.
एखाद-दुसरा अपवाद वगळता अपक्ष निवडून येतील, याची शक्यता धूसर आहे. अशा परिस्थितीत, निवडणुकांच्या
प्रचारास दिवाळीच्या माध्यमातूनच सुरूवात करण्याचे मनसुबे इच्छुकांमध्ये आहे. मतदारांना वेगवेगळ्या भेटवस्तू देण्याकडे अनेकांचा कल आहे.
त्यामध्ये दिवाळीच्या विविध वस्तू असतील, मिठाई, सुका-मेवा यासारखे पदार्थ असतील. काही भागात तर त्याही पुढे जाऊन टीव्ही, एलईडी, मोबाईल अशा वस्तू देण्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात येते.
वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. दिवाळी पहाट सारख्या कार्यक्रमांच्या लोकप्रियतेचा वापर खुबीने करण्यात येत आहे. यामध्ये सर्वपक्षीय आयोजकांचा समावेश आहे. लाखो-करोडो रूपये खर्चाची तयारी घेऊन उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. त्यातील बहुतांश पैशांचा विनियोग दिवाळीत करण्याचे घाटत आहे. या सगळ्या घडामोडीत
दिवाळीत मतदार राजाचे कल्याण होत असेल तर कोणाला नको आहे.