वृत्तसंस्था : आयपीएल (IPL Auction 2023) गव्हर्निंग कौन्सिलने नुकतीच 23 डिसेंबर रोजी होणार्या आयपीएल 2023 मिनी लिलावासाठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली. यंदाच्या मिनी लिलावात एकूण 405 खेळाडूंवर बोली लागणार आहे. त्यात 273 भारतीय खेळाडूंचा, तर 132 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी मंगळवारी आयपीएल लिलाव 2023 साठी शॉर्टलिस्ट केलेली खेळाडूंची यादी जाहीर केली. यात 991 नोंदणी केलेल्या खेळाडूंच्या यादीतून फ्रेंचायझींनी 369 खेळाडूंची यादी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडे सादर केली होती. त्यानंतर फ्रेंचायझींना अजून 36 नावांची निवड करण्यास सांगण्यात आले. यात अधिकचे 36 खेळाडू आणि आधीचे 369 खेळाडू असे मिळून एकूण 405 खेळाडूंचा लिलाव येत्या 23 डिसेंबरला कोचीमध्ये होणार आहे.
या 405 खेळाडूंपैकी 273 खेळाडू हे भारतीय आहेत, तर 132 खेळाडू हे विदेशी आहेत. 4 खेळाडू हे असोसिएट नेशन्सचे आहेत. यात एकूण 119 कॅप खेळाडू असून, 282 हे अनकॅप खेळाडू आहेत. 19 परदेशी खेळाडूंची बेस प्राईस 2 कोटी रुपये इतकी आहे; तर 11 खेळाडूंनी आपली बेस प्राईस ही 1.5 कोटी रुपये ठेवली आहे. मनीष पांडे आणि मयांक अगरवाल यांच्यासह 20 खेळाडूंनी आपली बेस प्राईस ही 1 कोटी रुपये ठेवली आहे.