पिंपरी : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेली टिका बालिशपणाचे लक्षण आहे. वास्तविक पाहता अजित पवार यांनी व्यक्त केलेले मत हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठी पदे घेऊन आता राष्ट्रवादी पक्षावर टिका करणार्यांबद्दल आणि सत्तेचे सर्व लाभ घेऊन सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष सोडणार्या व पक्ष सोडू इच्छिणार्यांबाबत होते, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवक्ता व मुख्य सरचिटणीस फजल शेख यांनी प्रसिद्धीपत्रकातून
म्हटले आहे.
शेख यांनी या प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे की, आमदार जगताप यांच्या वडिलांच्या दु:खद निधनानंतर राष्ट्रवादीचे स्थानिक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या दु:खात सहभागी झाले होते. बहुतांश पदाधिकार्यांनी प्रत्यक्ष भेटून जगतापांचे सांत्वन केले होते. दु:खात टिका करणे, ही आमच्या पक्षाची संस्कृती नाही. शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुरोगामी विचारानेच आणि त्यांच्या उत्कृष्ठ संघटन कौशल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवड शहरात सलग 10 वर्षे सत्तेवर राहून शहराचा कायापालट केला आहे.
तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहरातील विकास कामे झाली. त्यामुळेच बेस्ट सिटी, क्लिन सिटीचा पुरस्कार मिळाला. हा विकासाचा वेग पाहूनच शहराच्या आजुबाजूला असणार्या औद्योगिक पट्यात अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करून आपले प्रकल्प उभारणीस सुरुवात केली आहे. त्यातून शहरातील लाखो युवकांना रोजगार मिळेल. अनेक कुंटुंबांना उत्पनाचे साधन मिळेल. यामुळेच पिंपरी-चिंचवड शहरातील सुजाण नागरिक पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहणार आहेत व राष्ट्रवादी पिंपरी-चिंचवड महापालिकेत बहुमताने सत्तेवर येणार आहे.
या भीतीपोटी भाजपचे पदाधिकारी व इच्छुक उमेदवार हवालदिल झाले असून निवडणूक जशी जशी जवळ येईल तसा त्यांचा तोल जात आहे. राष्ट्रवादीचे लढवय्ये कार्यकर्ते अशा बालिश टिकेमुळे विचलित होणार नाहीत. राष्ट्रवादीच्या संघटन कौशल्यामुळे भाजपला शहरात आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांची वानवा आहे.
त्यामुळे भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना अमिष दाखवून त्यांचे उंबरठे झिजवत आहेत. तरीही त्यांच्या गळाला कोणी लागत नसल्यामुळे भाजपच्या पदाधिकार्यांचा तोल ढासळत असल्याने अशी टिका करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे भाजपने आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला फजल शेख यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.
भाजपने आत्मपरिक्षण करावे : फजल शेख
