धुळे : दिवंगत शरद जोशी यांच्या पश्चात शेतकरी संघटनेचे पहिले अधिवेशन दि. 10, 11 व 12 डिसेंबर रोजी नांदेड येथे होणार आहे. देशातील शेती अर्थव्यवस्थेत गंभीर प्रश्न तयार झाले असून या प्रश्नांवर चर्चा करुन त्याचे निराकरण करण्यासाठी हे अधिवेशन भरविले जात असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी गुणवंत पाटील म्हणाले की, गेल्या वर्षभरात दुष्काळाच्या संकटाबरोबरच शेतकर्यांमधून अस्वस्थता वाढल्याची लक्षणे वेगवेगळ्या स्वरुपात दिसू लागली आहेत. वाढत्या आत्महत्या, गुर्जर, जाट, पटेल आणि आता महाराष्ट्रात मराठा आंदोलनाच्या निमित्ताने अस्वस्थता स्पष्ट होत आहे. सरकार बदलले तरी शेतकर्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या प्रमाणात भाव मिळायला हवा.
यातून शेतकर्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. परंतु, केंद्र व राज्य सरकारे बाजारपेठेतील हस्तक्षेप वाढवून शेतकरी व व्यापारी या दोन्ही घटकांना वेठीस धरत आहे. या सरकारने शेती उत्पादनाची विक्री किंमत ठरविण्याचे अधिकार देखील स्वत:कडे घेतले आहेत. वायदेबाजारही अशा हस्तक्षेपामुळे अस्थिर होत आहे. बाजार समित्या बरखास्त करुन शेतीमाल विक्री निर्बंधमुक्त करण्याऐवजी त्यात जुजबी बदल करुन शेतकर्यांच्या लुटीची व्यवस्था चालू ठेवण्याची या सरकारची भूमिका आहे.
या पार्श्वभूमीवर डिसेंबरमध्ये होणार्या अधिवेशनात ग्रामीण पूनर्बांधणी बरोबरच बाजार आणि तंत्रज्ञान स्वातंत्र्यावर विविध अंगाने चर्चा होऊन पुढील आंदोलनाचा कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष रवी देवांग, कार्याध्यक्ष गोविंद जोशी, अधिवेशन सचिव अनिल घनवट, सीमा नरोडे
उपस्थित होत्या.
राज्यातील सर्वच प्रकल्प अपूर्ण
यावेळी संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील यांनी पाणी प्रश्नाकडेही लक्ष वेधले. ते म्हणाले की, राज्यातील एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. हे सर्व सरकारच्या संगनमताने होत आहे. अक्कलपाडा सारखे 9 कोटींचे धरण 35 वर्षात 250 कोटींवर गेले तरी ते पूर्ण झालेले नाही. परिणामी, जिल्ह्यात पावसाळ्यात टँकर सुरु आहेत. जे कालवे आहेत ते स्वच्छ करणे आवश्यक आहे. पाणी असूनही ते मिळत नसल्यामुळे शेतकर्यांचा उद्रेक होणे स्वाभाविक आहे. अक्कलपाडाप्रकरणी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेली दगडफेक नक्कीच सर्मथनीय नाही. तसा पोलिसांचा लाठीचार्जही सर्मथनीय नाही. पोलिसांनी चित्रफितीच्या साहाय्याने दगडफेक करणार्या लोकांना शोधून उर्वरीत निर्दोष शेतकर्यांना सोडून दिले पाहिजे.